शहरातील रस्त्यांचा खराब दर्जा, अवकाळी पावसाने झालेली त्याची दुर्दशा या विषयावर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सदस्यांनी जोरदार आवाज उठविला. ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची रस्ताकामे केली जात असताना रस्ते मुदतीपूर्वीच खराब होतात. ते रोखण्यासाठी रस्ता कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव, खर्च व कालावधी याचा फलक लावावा. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सभेमध्ये माजी सभापती राजेश लाटकर व शारंगधर देशमुख यांनी केली. वाढत्या अतिक्रमणाला पायबंद घालण्याचे काम प्रशासनाने करण्याची मागणी त्यांनी केली. यावर प्रशासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन अनेक संघटना आवाज उठवित असतात. मात्र या संघटनांपैकी नोंदणीकृत कोणती आणि विनानोंदणीकृत कोणती याचा थांगपत्ता लागत नाही. याबाबत प्रशासनाने नोंदणीकृत संघटना कोणती आहे याची माहिती द्यावी, अशी मागणी सुभाष रामुगडे यांनी केली. कामगार संघटनांनी सादर केलेली कागदपत्रे तपासून याबाबतची माहिती देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम मंद गतीने सुरू असल्याची तक्रार सदस्यांनी केली. हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे ड्रॉईंग वेळेवर पुरविण्यात यावे. तसेच महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची प्रगती दर पंधरवडय़ाला स्थायी समितीमध्ये दिली जावी, अशी मागणी सतीश घोरपडे यांनी केली. याबाबतची माहिती प्रशासन वेळेवर देईल असे सांगण्यात आले.
स्थायी समितीच्या गेल्या दोन बैठकांमध्ये खराब रस्त्यांचा विषय चर्चेला आला होता. त्याबाबत प्रशासनाला सदस्यांनी सूचनाही केल्या होत्या. निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदारांकडून होत आहे, अशा तक्रारी येत आहेत. याबाबत प्रशासनाने धोरणात्मक भूमिका घेऊन संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिगंबर फराकटे, महेश गायकवाड यांनी केले. रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. अवकाळी पावसामुळे श्रीकृष्ण कॉलनीमध्ये पाणी घुसले आहे. तेथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे हा प्रकार उद्भवला असल्याचे निदर्शनास आणून देऊन सुभाष रामुगडे यांनी या भागात फिरती करून प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा