पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी प्रशांत जाधवला बुधवारी रात्री अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला नगरला हलवले होते. गुरुवारी दुपारी त्याला कडेकोट बंदोबस्तात पाथर्डीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिवाजी केकाण यांच्यापुढे हजर करण्यात आले. त्या वेळी पीडित जाधव कुटुंबातील महिलांनी मोठा आरडाओरडा केला.
पोलिसांनी खास बाब म्हणून नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिश्रा यांना युक्तिवादासाठी निमंत्रित केले होते. त्यांच्यासह पाथर्डीचे सरकारी वकील शिवाजी गारडे यांनी बाजू मांडताना सांगितले, की घटनेचे पडसाद जगभरात उमटले आहेत. शस्त्रांनी तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृत सुनील जाधवचा मोबाइल हस्तगत करायचा आहे. यात एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता आहे. काही मुद्दे अधिक स्पष्ट केल्यास आरोपी सतर्क होतील, त्यासाठी १४ दिवसांची कोठडी मिळावी. आरोपीच्या वतीने वकील राणा खेडकर व वकील अमोल पालवे यांनी सांगितले, की गुन्हय़ाची फिर्याद प्रशांतनेच दिली. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी हत्या केल्याचे त्यात नमूद केले आहे. प्रशांत हा संजयचा पुतण्याच असून तो त्यांच्या घराशेजारीच राहतो. सवर्णानी हत्या केल्याची शक्यताही त्यात वर्तवली होती. त्यानुसार पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावले. गुन्हय़ात प्रशांत सहभागी असता तर त्याने नार्को चाचणीस नकार दिला असता, मात्र त्याने नकार दिलेला नाही. ४४ दिवसांनंतर पोलिसांनी प्रशांतच्या घरातून शस्त्रे जप्त केली, तशी शस्त्रे कोणत्याही शेतकऱ्यांच्या घरात सापडतील, त्यामुळे प्रशांतचा गुन्हय़ात सहभाग नाही.
 

Story img Loader