सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा देणाऱ्या व्यक्तीच्या प्रतीक्षेत पोलिसांना अखंड दिवस शुक्रवारी घालवावा लागला. शिवाय या व्यक्तीकडून आगळीक होऊ नये यासाठी अग्निशमन दलासह रुग्णवाहिकाही तैनात ठेवावी लागली. इतके करूनही संबंधित व्यक्ती मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे फिरकली नाही. याबाबतची माहिती अशी, सुरेश मारुती पवार (रा. इचलकरंजी, सध्या रा. गावभाग सांगली) याने मैनुद्दीन मोमीन व प्रमोद शिंदे (दोघे रा. इचलकरंजी) या दोघांकडून कर्जाने पैसे घेतले होते. कर्ज फेडीसाठी दोघांनीही पवारकडे तगादा लावला होता. या प्रकाराला कंटाळून पवार याने इचलकरंजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन कारवाई केलेली नव्हती. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पवार याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर शुक्रवारी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. या प्रकाराची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने शाहूपुरी पोलीस ठाण्याला दिली होती. त्यानुसार आज शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एक पथक पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दिवसभर तैनात ठेवले होते. याशिवाय अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांचीही सोय करण्यात आली होती. तथापि, दिवसभर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पवार हा फिरकला नव्हता. पण त्याच्या आत्महत्येच्या इशाऱ्याने पोलिसांची मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत चांगलीच तारांबळ झाली.

Story img Loader