शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या अडचणी अजूनही संपेना. माजी मंत्री बबन घोलप यांची उमेदवारी पक्षाने रद्द करून माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना ती दिली असली तरी घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनीही पक्षाच्या एबी फॉर्मसह बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेच्या वर्तुळात एकच गोंधळ उडाला. नंतर लोखंडे यांनीही पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला असून, याबाबतचा निर्णय आता उद्या (गुरुवार) छाननीत होईल. मात्र शिवसेना लोखंडे यांच्याच उमेदवारीवर ठाम आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेने माजी मंत्री बबन घोलप यांची उमेदवारी येथून निश्चित केली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्यात घोलप यांना मुंबई न्यायालयाने दोषी ठरवून त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने शिवसेनेला ऐनवेळी तेथे उमेदवार बदलावा लागला. घोलप मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेने येथून माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली.
दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजताच योगेश घोलप यांनी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या एबी फॉर्मसह एक आणि एक अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केले. त्यानंतर काही वेळाने लोखंडे येथे समर्थकांसह येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली. येथूनच मुंबईत वरिष्ठांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतर लोखंडे यांनीही एबी फॉर्मसह त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत पक्षाचे याबाबतचे प्रतिज्ञापत्रही दाखल करण्यात आले.
याबाबतचा अधिकृत निर्णय उद्या छाननीतच होईल. घोलप यांचा शिवसेनेचा अर्ज अवैध ठरल्यास ते अपक्ष अर्ज ठेवू शकतात. लोखंडे यांनी मात्र एकच म्हणजे पक्षाचाच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, की बबन घोलप यांची उमेदवारी रद्द करण्याआधी पक्षाने त्यांना कोरा एबी फॉर्म दिला होता. बुधवारी तोच योगेश घोलप यांनी दाखल केला. एकाच पक्षाकडून दोघांनी एबी फॉर्म दिल्यास नियमानुसार वेळेच्या प्राधान्यक्रमानुसार वैध अर्ज ठरवला जातो. मात्र नंतर अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराच्या एबी फॉर्ममध्ये आधीचा एबी अर्ज रद्द असा शेरा असेल तर मात्र वेळेनुसार नंतर आलेला अर्ज ग्राहय़ धरला जातो, हीच काळजी आम्ही लोखंडे यांच्या उमेदवारी अर्जात घेतल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येते. लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे उपनेते आमदार अनिल राठोड, नगरसेवक अनिल शिंदे, पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे त्यांच्या समवेत होते.
लोखंडेंच्या उमेदवारीवर शिवसेना ठाम!
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या अडचणी अजूनही संपेना. माजी मंत्री बबन घोलप यांची उमेदवारी पक्षाने रद्द करून माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना ती दिली असली तरी घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनीही पक्षाच्या एबी फॉर्मसह बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेच्या वर्तुळात एकच गोंधळ उडाला.
First published on: 27-03-2014 at 03:57 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion of yogesh gholaps ab form