लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं ही शिवरायांचीच आहेत, असं सांगून महाराष्ट्र शासन ही वाघनखं आपल्याकडे आणणार आहे. मात्र ती वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत, असं पत्र आपल्याकडे आहे असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. इंद्रजीत सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंद्रजीत सावंत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

“व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची वाघनखं घेऊन येणार, असा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र ते संग्रहालय स्वतः सांगतं आहे की, ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अधिकारी करारासाठी गेले होते तेव्हाही त्यांनाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ही वाघनखं शिवरायांची नाहीत. ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर तुम्ही जिथे ती प्रदर्शित कराल, तिथे ‘ही वाघनखं शिवरायांची नाहीत, त्याच्या सत्यतेविषयी खात्रीपूर्वक सांगता येत नाही, अशा पद्धतीचं पत्रंही तिथे प्रदर्शित करा, असंही संग्रहालयाने अधिकाऱ्यांना आणि प्रस्तुत मंत्र्यांना सांगितलं. असं असतानाही राज्यातील मंत्री आणि अधिकारी धादांत खोटं बोलून जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती त्यांचीच आहे असं सांगत त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.”, असं इंद्रजीत सावंत म्हणाले.

प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफला भेट दिल्याचं सांगितलं जातं, पण..

“छत्रपती शिवरायांची वाघनखं ही प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफला भेट दिली असं सांगितलं जातं. मात्र प्रतापसिंह महाराजांसारखा अत्यंत शिवप्रेमी माणूस ही वाघनखं देईलच कसा? शिवाय ग्रँट डफ भारतातून निघून गेल्यानंतरही प्रतापसिंह महाराजांनी छत्रपती शिवरायांची वाघनखं ही अनेकांना दाखवली आहेत. अशा परिस्थिती ते ती वाघनखं कशी काय देतील? मूळात ती वाघनखं बाहेर जातीलच कशी?” असा प्रश्न इंद्रजीत सावंत यांनी विचारला आहे.

हे पण वाचा- Uddhav Thackeray: वाघनखांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंची सुधीर मुनगंटीवार आणि भाजपावर टीका

सचिन अहिर काय म्हणाले?

सचिन अहिर म्हणाले की, “इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं आहे की, त्यांना संग्रहालयाने पत्र पाठवलं. त्या पत्रात ही वाघनखं छत्रपती शिवरायांची असण्याविषयी कोणताही दावा नाही. किंबहुना, ही वाघनखं शिवरायांची असू शकतात किंवा नसूही शकतात असा संभ्रम निर्माण करणारी भूमिका संग्रहालयाने घेतली आहे. आता राज्य सरकारने हे स्पष्ट करायला हवं की, कोट्यवधी रुपये खर्च करुन तुम्ही ही वस्तू आणणार आहात, ती खरंच शिवकालीन आहेत का? तसे असेल तरच त्याला अर्थ आहे. अन्यथा ती एकप्रकारे जनतेच्या पैशांची लूट असेल. त्यामुळे सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी.” अशी मागणी सचिन अहीर यांनी केली आहे.

व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाने पत्रात काय म्हटलं आहे?

म्युझियमने दिलेले पत्र

प्रति इंद्रजीत सावंत,

तुमचं पत्र मिळालं. तुम्ही अॅड्रियन ग्रँट डफ यांच्याबाबत आणि त्यांना भेट देण्यात आलेल्या वाघनखांबाबत संग्रहालयाकडे विचारणा केलीत. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला आहे, त्या वंशजांचे अनेक उल्लेख आमच्याकडे आहेत. अॅड्रियन ग्रँट डफ हा जो उल्लेख तुम्ही केलात त्यांचा मृत्यू १९१४ मध्ये झाला. ते जेम्स ग्रँट डफ यांचे नातू होते. ज्या अॅड्रियन यांनी संग्रहालयाला वाघनखं भेट दिली त्यांचा मृत्यू २०१९ मध्ये झाला. आमच्याकडे असलेल्या उल्लेखाप्रमाणे २८ ऑक्टोबर १९७१ या दिवशी ही वाघनखं संग्रहालयात आली.

आम्ही ही बाब मान्य करतो की, सदर वाघनखांबाबत संभ्रम आहे. जी वाघनखं व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत, ती छत्रपती शिवरायांची असून त्याच वाघनखांनी त्यांनी अफझल खानाचा वध केला का याबाबत संभ्रम आहे. याची आम्ही पारदर्शीपणाने महाराष्ट्र सरकारला कल्पना दिलेली आहे. तसंच आम्ही त्यांना हेदेखील सांगितलं आहे की, तुम्ही ज्या ठिकाणी ही वाघनखं लोकांना पाहण्यासाठी ठेवाल तिथे ही वाघनखं शिवरायांची आहेत का, याविषयी अनिश्चितता आहे अशी माहितीही तिथे ठेवावी. असं करण्यास त्यांची काहीच हरकत नसावी, अशी अपेक्षा आहे.

डॉ. ट्रिस्टरॅम हंट, संचालक, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम

हे पत्र इंद्रजीत सावंत यांना पाठवण्यात आलं आहे. त्यांनी या वाघनखांबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात संग्रहालयाशी संपर्कही साधला होता. आता संग्रहालयाने त्यांच्या पत्राचं उत्तर पाठवलं आहे. या पत्रात ग्रँट डफ यांची संपूर्ण वंशावळही देण्यात आली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन इंद्रजीत सावंत यांनी वाघनखांबाबत संग्रहालयाने पाठवलेलं पत्र दाखवलं आणि आपलं म्हणणंही सविस्तर मांडलं.