सांगली : करोनाकाळातील सभेतील इतिवृत्तातील विषयांना चर्चेनंतर मंजुरी द्यावी या मागणीसाठी भाजप व काँग्रेसचे सदस्य एकत्र आल्याने महापालिकेत प्रचंड गदारोळ माजला. भाजप सदस्यांनी उपस्थित केलेल्या औचित्याचा मुद्दा महापौरांनी दुर्लक्षित करीत सभागृह सोडले. भाजप सदस्यांनी राजदंडही हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, आजची सभा दोन तास चालविण्यात आली असून सर्व विषय मंजुरीनंतरच सभा संपली असल्याचा दावा महापौरांनी केला.

करोनामुळे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आभासी महासभेत चर्चा न करता विषय मंजूर करण्यात आले असून ही सभा गणपूर्ती न होता राष्ट्रवादीने तशीच घेतली असल्याचा आक्षेप भाजप व काँग्रेसने घेतला आहे. विद्युत विभागातील मानधनावरील कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्याने सानुग्रह  अनुदान देण्याचा औचित्याचा ठराव संतोष पाटील, गजानन मगदूम, अनारकली कुरणे, जगन्नाथ ठोकळे, सविता मदने यांनी मांडला. यावर दोन तास चर्चा झाल्यानंतर याबाबत नियमावली निश्चित करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी  झालेल्या आभासी महासभेत झालेल्या विषयावर पुन्हा चर्चा करून मगच मंजुरी देण्यात यावी, असा औचित्याचा मुद्दा भाजपच्या श्रीमती मदने यांनी मांडला. त्यानंतर गोंधळास सुरुवात झाली.  

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी फेब्रुवारीमध्ये झालेली महासभा वैध असून इतिवृत्त कायम करण्याचा  आग्रह धरला तर  भाजप व काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. यातून जोरदार घोषणाबाजी झाली. भाजपचे व काँग्रेसचे सदस्यांनी पीठाकडे धाव घेत महापौर सूर्यवंशी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ अधिकच  वाढला. यातच भाजपच्या  सदस्या अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी राजदंड उचलून सभागृहामध्ये उंचावला. भाजप सदस्यांनी पळाले, पळाले महापौर पळाले अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्याने महापौर सभागृहाच्या डाव्या प्रवेशद्बारातून बाहेर पडले.

याबाबत सभागृहनेते भाजपचे विनायक सिंहासने यांनी मागील सभेत चर्चा न करता ५२ विषय मंजूर करण्याचा घाट राष्ट्रवादीने घातला असून या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जावा अशी आमची भूमिका आहे असे सांगितले. सभेचे कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचा असून याला आमचा विरोध राहील असेही ते म्हणाले.

फेब्रुवारी महिन्यात आभासी झालेल्या सभेत सदस्यांची गणपूर्ती न होता, नव्वदहून अधिक ठराव करण्यात आले असून या ठरावांवर चर्चा करून निर्णय घेतला जावा अशी आमची भूमिका असल्याचे काँग्रेसचे गटनेते विरोधी पक्ष नेते संजय मेंढे यांनी सांगितले. महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी असली तरी चुकीच्या कामकाजाला आमचा विरोधच राहील असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या सभेपुढील सर्व विषय मंजूर झाले असून मागील सभेच्या वैधतेबाबत न्यायालयानेही हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या भाजपने आजच्या सभेत गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. आजची सभा रितसर झाली असून मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader