काँग्रेसचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत, कोणीणीही नॉटरिचेबल नाही, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. १० आमदार व काही मंत्री आपापल्या मतदारसंघातून मुंबईला निघाले आहेत, ते सांयकाळपर्यंत पोहोचतील. सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत, काही आमदार संपर्क कक्षेच्या बाहेर आहेत, अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या असत्य असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे.
विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागताच शिवसेनेत सुरु झालेल्या राजकीय घडामोडीच्या पाश्वर्भूमीवर मंगळवारी सकाळी महसूल मंत्री थोरात यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवास्थानी मंत्री व आमदारांची बैठक झाली. बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजित कदम, आदी मंत्रयांसह ३० आमदार बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के. पाटील रात्री मुंबईत दाखल होत आहेत. तर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजकीय घडोमाडीचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ नेते कमलनाथ उद्या सकाळी मुंबईत येत आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.