वाई: पुणे, मुंबईवरून गणेशोत्सवासाठी एकाच वेळी गावाकडे जाणाऱ्यांनी गर्दी केल्याने पुणे सातारा महामार्गावर, खंबाटकी घाटात व आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. आनेवाडी टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने आणि महामार्गावर कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्याने प्रवासी संतप्त झाल्याचे दिसून आले.
मंगळवार पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. आपल्या घरी कुटुंबीयांसोबत उत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी घरी जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबई पुण्याकडून सातारा सांगली कोल्हापूर कोकणात जाण्या-येणाच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांची होणारी गर्दी पाहता आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्यावर अधिकच्या लेन सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे. शनिवार सायंकाळ पासून महामार्गावर वाहतूक वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. एस टी बसही हाउस फुल्ल आहेत. सातारा मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
आणखी वाचा-सांगली : मराठा आरक्षण मागणीसाठी भव्य मोर्चा
प्रवाशांची झालेली गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळांच्या वतीने विभागातून जादा बसेसचे नियोजन केले आहे.वाहतूक कोंडीने प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. वाहतूक कोंडीने हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. आज रविवार दिवस रात्र महामार्ग भरून वाहील असा अंदाज आहे. महामार्गावर खंबाटकी घाट, अनेवाडी टोल नाका येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.