दिगंबर शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या गडावर प्रभुत्व राखण्याचा भाजपा प्रयत्नशील असतानाच पक्षांतर्गत बेदिली माजण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार संजयकाका पाटील यांची पक्षात एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप पक्षातून होऊ लागला असून याचे पडसाद निवडणुकीवर उमटतील अशी शक्यता पक्षीय पातळीवरून वर्तवली जात आहे. यामुळे उमेदवाराची खांदेपालट केली तर कसे यावर पक्षाच्या वरिष्ठ गोटातून विचारमंथन सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात नागजला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा झालेला कार्यक्रम असो वा गेल्या आठवडय़ात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व गजेंद्रसिंग गेहलोत यांचा झालेला कार्यक्रम यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अनुल्लेखनीय करण्यामागे खासदारांचा होरा दिल्लीपेक्षा मुंबईला प्राधान्य असल्याचे मानले जात आहे.
लोकसभेसाठी पुन्हा खासदार संजयकाका पाटील यांनाच भाजप संधी देणार असे जरी चित्र असले तरी पक्षाच्या अंतर्गत गोटात खदखद आहे. भाजपने गेल्या निवडणुकीवेळी पक्षविस्तार करण्याबरोबरच एकेक जागेसाठी संपूर्ण ताकद लावून काँग्रेसचा गड सर केला. यात निष्ठावंत गट बाजूला गेला. पक्षाच्या विजयात मोलाचा हातभार सांगली ही मक्तेदारी मानत असलेल्यांच्या मित्रांनीच लावला होता. जिल्ह्य़ाचे नेतृत्व कुणाकडे यातून हा संघर्ष वसंतदादांच्या पश्चात सुरू झाला. यातूनच भाजपला आयती संधी मिळत गेली. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती अशा एकेक स्थानिक संस्थांचा कारभार आपसूक भाजपच्या हाताखाली आला. ज्या सहकार क्षेत्राने नेतृत्व केले. त्या सहकार क्षेत्रात आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच कधी काँग्रेसशी, कधी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत सत्तेत सहभाग मिळविला.
खासदार पाटील यांचा मूळचा पिंड काँग्रेसच्या पठडीतला. राष्ट्रवादीत असताना दुष्काळी फोरमच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दबाव गट निर्माण करून राजकारण करण्यात त्यांनी काही वर्षे घालवली. त्यांना विधान परिषद, अण्णासाहेब पाटील आíथक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. राष्ट्रवादीतून आपल्या राजकीय आकांक्षापूर्ती होत नाही हे लक्षात येताच त्यांनी भाजपशी घरोबा केला.
वर्षांपूर्वी खासदारांची वेगळी हालचाल सुरू असल्याचे लक्षात येताच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद आणि कॅबिनेट दर्जा देण्यात आला असल्याचीही चर्चा पक्षीय पातळीवरून सुरू आहे.
खासदार पाटील यांचे मन दिल्लीपेक्षा मुंबईतच जास्त रमते हे उघड गुपित आहे. जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नावर खासदाराएवढा अभ्यास खचितच एखाद्या विधानसभेतील प्रतिनिधीने केला असेल ही गोष्ट जाहीर आहे. जलसिंचन विभागाच्या वारंवार बठका घेणे, कामांना गती देणे, केंद्रातून निधी आणण्याचा प्रयत्न करणे ही कामे खासदार अग्रहक्काने करतात हे स्पष्ट आहे. यात त्यांचा मतदार संघ असला तरी ठेकेदारांचे कोंडाळेही काकांच्या अवतीभोवती असते हे निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखे आहे असे म्हणता येणार नाही. यातून आता तर अधिकृत उपाध्यक्ष पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे आणि केंद्र शासनाकडून आíथक मदतही मिळणार असल्याने कामाला चांगला वाव मिळाला आहे.
तासगाव येथे सुरेश प्रभू यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पक्षातील प्रमुख नेते मंडळींना बाजूला ठेवण्यात आले होते. अगदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने पृथ्वीराज देशमुख यांच्यासह जिल्ह्य़ातील पक्षाच्या सर्व आमदारांना आमंत्रित करण्यात आलेले नव्हते. तरीही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार ही मोजकीच मंडळी या निष्ठावंत गटातील मंडळी उपस्थित होती. या बरोबरच मिरजेचे आमदार सुरेश खाडे हे उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना आमदार खाडे हे मंत्री प्रभू यांच्याशी कानगोष्टी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी खासदारांनी सुरेशभाऊ आम्ही मंत्र्यांना आणले आहे असे सांगितले. यानंतर खाडे यांनी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत मौन बाळगले.