शहरातील टोल आकारणीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये श्रेयवाद रंगला असताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मात्र शुक्रवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी टोलप्रश्नी निर्भीड भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
यापूर्वीच्या आयुक्तांच्या बोटचेप्या भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर बिदरी यांनी कोणताही दबाव न घेता रस्ते काम अपूर्ण असल्याचा वस्तुस्थितिजनक अहवाल शासनाला सादर केला. या अहवालाचे अवलोकन करूनच न्यायालयाने टोल आकारणीस स्थगिती दिली असल्याने नगरसेवकांनी बिदरी यांच्या भूमिकेचे ठरावाद्वारे कौतुक केले. तथापि, आजच्या सभेसाठी तब्बल २२ विषय असतानाही श्रद्धांजली, अभिनंदनपर ठराव असे केवळ पाच मिनिटांचे कामकाज आटोपल्यानंतर सभासदांनी सभागृह सोडल्याने सभाध्यक्ष महापौर सुनीता राऊत यांना सभा शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामागे विषयपत्रिकेतील दोन विषयांवर अर्थपूर्ण व्यवहाराचे कारण असल्याची चर्चा रंगली होती.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक विषयांवरून नगरसेवकांकडून प्रशासनाला धारेवर धरले जाते. त्यावरून नगरसेवक व आयुक्त यांच्यात शाब्दिक खडाजंगी होत असल्याचे चित्रही पाहायला मिळते. मात्र शुक्रवारची सभा या प्रसंगाला अपवाद ठरणारी होती. उलट या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकदा नव्हेतर दोनदा आयुक्त बिदरी यांच्यावर अभिनंदनाचा मारा केला. टोलप्रश्नी आयुक्तांनी घेतलेल्या निर्भीड भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पाठोपाठ केंद्र शासनाकडून केएमटीला नव्या १०४ बसेस मिळविण्याची कामगिरी केल्याबद्दलही बिदरी यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवकांनी संमत केला.
अभिनंदन ठरावाची औपचारिकता पार पडल्यानंतर मुख्य कामकाजास सुरुवात झाली. ठराव संमत झाल्याचे दिसताच त्याची खात्री करून एकेक नगरसेवक सभागृह सोडू लागला. अवघ्या काही मिनिटांतच सभागृह ओस पडले. स्थायी सभापती सचिन चव्हाण, वसंत कोगेगर, चंद्रकांत पोवार यांसारखेच मोजकेच नगरसेवक सभागृहात हजर होते. सभेसाठी आवश्यक असणारी गणपूर्ती दिसत नसल्याचे पाहून महापौर राऊत यांनी सभा उद्या सकाळी १० वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.
टोल स्थगितीबद्दल आयुक्तांचे अभिनंदन!
शहरातील टोल आकारणीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये श्रेयवाद रंगला असताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मात्र शुक्रवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी टोलप्रश्नी निर्भीड भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
First published on: 01-03-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congratulations to commissioner about toll hold