नुकत्याच संपलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुती अर्थात भाजपा, अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट यांनी उभे केलेले सर्व उमेदवार निवडून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उभ्या करण्यात आलेल्या तीनपैकी दोन उमेदवारांना विजय मिळवता आला. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांना फक्त १२ मतं मिळाली. या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसची ७ मतं फुटल्याचं स्पष्ट झालं असून आता त्या ७ विधानसभा आमदारांवर पक्षाकडून कारवाई होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नागपूरमधील विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ट्रॅप लावला, आमदार अडकले”

अभिजीत वंजारी यांनी विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेसकडून ठरवण्यात आलेली रणनीती टीव्ही ९ शी बोलताना सांगितली. “क्रॉसव्होटिंग करणाऱ्या आमदारांसाठी कारवाई एकच आहे. ज्यांनी पक्षादेशाचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबन हीच कारवाई होणार. हे निश्चित आहे. चंद्रकांत हंडोरेंच्या बाबतीत जे घडलं ते पुन्हा घडू नये असं धोरण वरीष्ठ नेत्यांनी ठरवलं होतं. प्लॅन परफेक्ट केला होता. त्या ट्रॅपमध्ये हे पक्षाशी बेईमानी करणारे लोक सापडले”, असं अभिजीत वंजारी म्हणाले.

कुणाला किती मतं ठरली होती?

“प्रज्ञा सातव यांना आम्ही ३० मतं द्यायचं ठरवलं होतं. त्यातली २५ मतं त्यांना मिळाली. याचा अर्थ त्यांना पाच मतं मिळाली नाहीत. त्याशिवाय आम्ही ७ मतं मिलींद नार्वेकरांना द्यायचं ठरवलं होतं. त्यापैकी दोन मतं फुटली. त्यामुळे एकूण काँग्रेसची ७ मतं फुटली आहेत हे बरोबर आहे”, असं अभिजीत वंजारी म्हणाले.

पराभवानंतर जयंत पाटील यांचा मोठा दावा; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मतांविषयी म्हणाले, “त्यांचं एक मत…”!

“येत्या २ ते ४ दिवसांत या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. पक्षश्रेष्ठी या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत. पक्षादेशाचं उल्लंघन म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंच्या आदेशांचंच उल्लंघन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इतरांना मतदान करणं यापेक्षा दुसरी बेईमानी असू शकत नाही. त्यामुळे राज्यातल्या सर्व काँग्रेस प्रेमींची हीच इच्छा आहे की त्या आमदारांची नावं जाहीर करण्यात यावी आणि त्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी”, असंही अभिजीत वंजारी म्हणाले.

काय लागला विधानपरिषदेचा निकाल?

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार जिंकले असून मविआचे २ उमेदवार विजयी झाले. यात भाजपाचे सर्व ५ उमेदवार, अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार व एकनाथ शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा समावेश आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर व काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या. तर शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress 7 mla cross voting mlc election result suspension by party pmw