अहिल्यानगरःकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपले राजीनामा पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेसचे कार्य समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पाठवले आहे. राजीनामा पत्रात त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे कारण मात्र स्पष्ट केलेले नाही.
आपण लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करू, असे किरण काळे यांनी समाजमाध्यमात प्रसिद्ध केले आहे. असे असले तरी ते शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात अलीकडेच प्रवेश केला आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरात ठाकरे गटाकडे पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरण काळे ठाकरे गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजले.
किरण काळे यांनी एकत्रित राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकीय वाटचाल सुरू केली. नंतर शहरातील पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी झालेल्या संघर्षातून त्यांनी गेल्या सन २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.व अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यावर सुमारे साडेचार वर्षांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली. किरण काळे यांनी काँग्रेसला आक्रमक चेहरा देण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी ते इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहिल्यानगर शहराची जागा काँग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. अलीकडच्या काळात झालेल्या घडामोडीत ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. काही जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला शहरात नेतृत्वाची उणीव भासत आहे. ही संधी किरण काळे साधण्याची शक्यता आहे.