ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकावरून काँग्रेसलाच लक्ष्य केले. चार राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे, याची त्यांनी दखल घेतली पाहिजे. जनलोकपाल विधेयक संमत करण्याचे आश्वासन पाळले नाही, हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. जनतेचा झालेला विश्वासघात मतपेटीतून प्रदर्शित झाला. येत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल मंजूर झाले नाहीतर लोकसभा निवडणुकीतही जनता पुन्हा काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे हजारे म्हणाले. चार राज्यांच्या निकालात मोदींचा प्रभाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणाच्या पूर्वसंध्येला सोमवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी संवाद साधला.
हजारे म्हणाले,ह्वहे विधेयक संमत झाले तर लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. भूमी अधिग्रहण, पेन्शन, तुरुंगात असताना निवडणूक लढविण्याचा अधिकार आदी विधेयके सरकाने मंजूर करून घेतली. जनलोकपाल जनतेच्या हिताचे नव्हते का, ते दोन वर्षे राज्यसभेत का रोखून ठेवले असा सवाल त्यांनी केला. लोकसभेच्या मैदानातही आपण उतरणार नाही, मात्र जनतेमध्ये जागृती करू. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. या अधिवेशनात हे विधेयक येऊ शकले नाहीतर अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे. स्वत:च्या फायद्यासाठी अधिवेशनाचा ज्याप्रमाणे कालावधी वाढविला जातो तसा जनतेच्या हितासाठी तो वाढविला पाहिजे.ह्व                                                                      
पाठिंब्यामुळे सरकार पंगू होते, तंदुरुस्त नाही. काँग्रेसच काय कोणाचाही पाठिंबा घेऊन तयार होणारे खिचडी सरकार जनतेच्या कामाचे नाही. पाठिंबा देणाऱ्यांना सांभाळण्यातच मोठा वेळ खर्च होतो. अरविंदला देशात लोकतंत्र आणायचे आहे. भ्रष्टाचारमुक्त भारताची निर्मिती करायची असेल तर खिचडी सरकारमुळे ते होणार नाही, असे सांगून हजारे यांनी दिल्लीत केजरीवाल यांनी कोणाला पाठिंबा देऊ नये व कुणाचा पाठिंबा घेऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, मतदार जागरूक नाही याचा चार राज्यांत भाजपला फायदा झाला. काँग्रेस व भाजप हे दोन्ही मोठे पक्ष सत्तेत राहू किंवा विरोधात बसू असा विचार करतात. या दोघांना धडा शिकविणारी तिसरी शक्ती देशात उदयास येईल का याचा आम्ही शोध घेत आहोत. तिसरा पर्याय म्हणून आम आदमी पार्टी होऊ शकते का असे विचारले असता चांगले आहे, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. चांगल्या लोकांना आम्ही आशीर्वाद देऊ.

केजरीवाल यांचा पाठिंबा आता नको                                                
‘केजरीवाल यांचा आता राजकीय पक्ष आहे, त्यामुळे जनलोकपाल विधेयकासाठी आम्ही आता त्यांचा पाठिंबा घेणार नाही. त्यांना आमच्या व्यासपीठावरही येऊ देणार नाही. त्यांनी बाहेरून पाठिंबा द्यावा,’ असे हजारे म्हणाले. याच मुद्दय़ावर केजरीवाल लोकसभा निवडणुकीत उतरले तरी त्यांना पाठिंबा देणार नाही, मात्र आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader