सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष झाला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी सावध भूमिका व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, “मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजपा दोन्ही फसवे पक्ष आहेत. आम्ही बाहुले नाही, तर पक्षाचे मालक आहोत. जसे, मोठा मासा छोट्या माशाला खातो, तसं आम्हाला ते खात आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहावे लागणार आहे. काँग्रेसबरोबर गेलेल्या पक्षांची अवस्था बघा. आता काँग्रेसचेच भाजपा झालं आहे,” असा हल्लाबोल महादेव जानकर यांनी केला.
हेही वाचा : “तुम्हीच मूर्ख आहात”, भरमंचावर शिवव्याख्याता खासदार अनिल बोंडेंशी भिडला, VIDEO व्हायरल
शिवसेना पक्षाबाबत बोलताना जानकर यांनी सांगितलं की, “एखादं मंडळ काढणं सोपं असतं. पण, पक्ष काढणे खूप अवघड आहे. पक्ष काढणाऱ्याच्या हृदयाला काय वेदना होतात हे त्यालाच माहिती. बाळंतपणीला जी वेदना होते, ते ज्यांचं बाळंतपण होत नाही त्यांनी बोलू नये. त्या वेदनेशी सहमत आहे.”
हेही वाचा : “संजय राऊत अलिकडे इतकं बिनडोक…” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘त्या’ पत्रावर प्रतिक्रिया
२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना जानकर म्हणाले की, “निवडणुकीच्या दृष्टीने ९० हजार पोलिंग बूथ आम्ही तयार करत आहे. ४० ते ४२ टक्के काम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढण्याची आमची तयारी आहे. परभणी, बारामती, माढा, मिर्जापूर या चार मतदारसंघावर लक्ष केलं आहे. या चार मतदारसंघापैकी दोन जागी विजय निश्चित आहे,” असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.