काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये एकटय़ाने लढण्याची सध्या ताकद नाही, देशातील परिस्थितीच अशी आहे की दोन्ही पक्ष एकटय़ाने लढू शकणार नाहीत, त्यामुळे नगरच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करावी, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी आज केली.
आदिक यांच्या उपस्थितीत त्यांच्या दोन्ही काँग्रेसमधील समर्थकांचा बहुद्देशीय मेळावा शुक्रवारी दुपारी नगर क्लबमध्ये झाला. या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, आमदार अरुण जगताप, मेळाव्याचे निमंत्रक दादा कळमकर आदी या वेळी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी मेळाव्यास काही वेळच हजेरी लावली, मात्र त्यांचे चिरंजीव माजी महापौर संग्राम जगताप मेळाव्यास पूर्ण वेळ उपस्थित होते.
मनपाची निवडणूक ही प्रयोगशाळा आहे, हे पाऊल दोन्ही पक्षांनी व्यवस्थित टाकले तरच पुढे राज्यात व केंद्रात यश मिळेल. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षीय अभिनिवेश न ठेवता ‘क्रेडिट’चा मुद्दा न करता एकत्र निवडणूक लढवावी, राज्य व केंद्र सरकारने गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले नाहीत, इतके चांगले निर्णय गेल्या चार वर्षांत घेतले तरीही देशातील परिस्थिती सोपी राहिलेली नाही, असा इशारा आदिक यांनी दिला. संग्राम जगताप यांना ताकद देण्याचेही आवाहन त्यांनी केले.
नगर शहराला संरक्षणाची नाहीतर ख-या अर्थाने विकासाचीच गरज आहे, असे स्पष्ट करताना पाचपुते यांनी शहराच्या विकासाआड शहराचाच लोकप्रतिनिधी येत असल्याचा टोला लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा