महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. येत्या १२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. पाठोपाठ काँग्रेसनेही त्यांचा एक उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. परिपत्रकात म्हटलं आहे की विधानसभा सदस्यांद्वारे निवडल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक लढवण्यासाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावास पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंजुरी दिली आहे.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. त्यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ आता संपणार असून पक्षाने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. याआधी सोनिया गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली होती. यावेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

काँग्रेसने मित्रपक्षाचा विरोध जुगारला

हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी आघाडीचा (महाविकास आघाडी) धर्म पाळला नाही. त्यांनी पक्षाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत कार्यकर्ते आणि मतदारांना संभ्रमित केलं होतं अशी लेखी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रज्ञा सावत यांचं राजकीय वलय आहे. मात्र त्यांनी लोकसभेला आपल्याला मदत केली नाही, असं आष्टीकरांनी म्हटलं होतं. तसेच प्रज्ञा सातव यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी दिली जाऊ नये, असंही म्हटलं होतं. मात्र, काँग्रेसने या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष करत पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी केली आहे.

हे ही वाचा >> पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

दुसऱ्या बाजूला भाजपाने पाच जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपाने विधान परिषदेवर पाठवण्याची योजना आखली आहे. मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना देखील पक्षाने उमेदवारी दिली आहे.