राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, तसेच काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते. या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आल्यानंतर बिनविरोध निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.
ही तर महाराष्ट्राची परंपरा…
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला दिला. “आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी
चर्चा करायला हवी..
दरम्यान, यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. “अशा विषयांमध्ये आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यानुसार आम्ही (फडणवीसांची) भेट घेऊ”, असं थोरात यावेळी म्हणाले.
रजनी पाटील यांच्या निवडीचा निर्णय…
राजीव सातव यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा डॉ. प्रज्ञा सातव यांच्याऐवजी रजनी पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यावरून काँग्रेसवर टीका केली जात आहे. तसेच, भाजपानं देखील याच मुद्द्याचा आधार घेऊन उमेदवार उभा करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय वरीष्ठ पातळीवर झाला असल्याचं थोरात म्हणाले. “हा निर्णय वरिष्ठ स्तरावर होत असतो. रजनी पाटील या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. देशभर त्यांनी काम केलं आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रभारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. आता सोनिया गांधींनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे”, असं ते म्हणाले.