संजीव कुळकर्णी
नांदेड : कर्नाटकच्या भूमीतील ज्येष्ठ नेते खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झालेला असतानाच, दिवाळी संपल्यानंतर पक्षाचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांची मोठय़ा पल्ल्याची ‘भारत जोडो यात्रा’ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात महाराष्ट्रात दाखल होत असून या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार असल्यामुळे काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यात्रेचे स्वागत आणि इतर व्यवस्थांसाठी लगबग सुरू आहे.
राहुल गांधी यांची ही यात्रा सुरू होऊन सुमारे दीड महिना झाला आहे. केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये तिला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सध्याच्या आंध्र प्रदेशातील टप्प्यात हा प्रतिसाद थोडा कमी असला, तरी ही यात्रा नांदेड जिल्ह्यात ७ नोव्हेंबरला दाखल झाल्यानंतर पुढील चार-पाच दिवस संपूर्ण माहोल ‘यात्रामय’ करण्याचे नियोजन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आतापर्यंतच्या पूर्वतयारीत यात्रेकरूंच्या मुक्कामाची स्थळे, तेथे आवश्यक असलेल्या सुविधा, भोजन व्यवस्था आणि इतर बाबी निश्चित झाल्या आहेत.
या यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने प्रदेश काँग्रेसतर्फे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात नांदेडला पहिली भेट दिली. तेव्हापासून यात्रेच्या स्वागताची सुरू झालेली तयारी आता गतिमान झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा देगलूर-नायगाव-नांदेड ते अर्धापूर असा सुमारे सव्वाशे किलोमीटरचा प्रवास होणार असून यात्रेच्या मार्गालगतच्या प्रत्येक गावामध्ये काँग्रेस कार्यकर्ते भेटी देत असून या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राहुल गांधी व त्यांच्यासमवेतच्या भारतयात्रींच्या एकंदर व्यवस्थेचे नियोजन कशा प्रकारे करावे लागते, हे जाणून घेण्यासाठी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गेल्या महिन्यात केरळला गेले होते. या पथकाने तेथून सर्व तपशील जमा केला. त्यानंतर अ.भा. काँग्रेसचा एक चमूही नांदेडला पाहणी करून गेला. त्यांच्या सूचनांनुसार संपूर्ण नियोजन होत असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे यांनी दिली. काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे खा. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांच्या सतत संपर्कात असून यात्रेदरम्यानच्या व्यवस्थांतील बारीक-बारीक तपशील मिळवून त्यानुसार तयारी होत असल्याचे सांगण्यात आले.