सोलापूर : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसजणांनी सोलापुरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गांधी कुटुंबीयांची सखोल चौकशी व्हावी म्हणून आंदोलन केले.
काँग्रेसच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाले. दहा वर्षांपूर्वी बंद केलेली तपासाची फाईल मोदी सरकारने दुष्ट हेतूने पुन्हा उघडल्याबद्दल नरोटे यांनी या वेळी संताप व्यक्त केला. या आंदोलनात शहर महिला अध्यक्षा प्रमिला तूपलवंडे, पक्षाचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सुदीप चाकोते, श्रीदेवी फुलारे, ॲड. करिमुन्निसा बागवान, संजय गायकवाड, शोभा बोबे, आजी मला नदाफ आदींचा सहभाग होता.
दुसरीकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कन्ना चौकात नॅशनल हेरॉल्डप्रकरणी गांधी परिवाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी आंदोलन केले. भाजयुमोचे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गांधी कुटुंबीय ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी का घाबरत आहे, असा सवाल आंदोलकांनी केला. भाजयुमोचे शहर सरचिटणीस रवि कोटमळे, अनिल कंदलगी, जय साळुंखे, अजित गादेकर, नरेंद्र पिसे, राहुल घोडके, सिद्धार्थ मंजेली आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.