संजय राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया : काँग्रेसने २५ वर्षांनंतर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी येथून उमेदवार देण्याची मागणी लावून धरत ‘तुम्ही लढा’ या वृत्तीचे दर्शन घडवले. उमेदवारीचा प्रश्न आल्यावर त्याला बगल कशी देता येईल, याचेच डावपेच रचले गेले. मात्र, सक्षम उमेदवाराअभावी काँग्रेसच्या उमेदवारीचा गाडा पुढे कसा जाणार, असा पेच यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

 १९९९ पूर्वी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचो बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.  केशवराव पारधी यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. चौथ्यांदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेला. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथून विजयी झाले होते. मात्र, २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांमध्ये भाजपने येथून विजय मिळवला.

संकल्प पदयात्रा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ३ ते १३ सप्टेंबरदरम्यान गोंदिया व भंडारा जिल्ह्यात संकल्प पदयात्रा काढण्यात येणार आहे.

संघटना बांधणीवर भर

 काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आधी संघटनाबांधणीवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला आहे. मतदारसंघासाठी पक्षश्रेष्ठी जो उमेदवार निश्चित करतील त्याच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे उभे राहतील. उमेदवारीवरून आतापासूनच पक्षात वाद नको म्हणून वेळेवर नाव जाहीर करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड आणि भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दोन्ही जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदार, जातीनिहाय मतदारांची संख्या, कोणता उमेदवार सक्षम ठरू शकेल याचा संपूर्ण अभ्यास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress claims gondia bhandara lok sabha constituency candidacy after 25 years ysh