भाजपा नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयकावर सभागृहात बोलताना ‘एलजीबीटीक्यू’ समुहाच्या प्रतिनिधींनाही सदस्य म्हणून नियुक्तीच्या तरतुदीला विरोध करत, समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का? असा सवाल केला होता. तसेच, यावेळी त्यांनी अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा असं वादग्रस्त वक्तव्यही केल्याचं समोर आलं. यावरून आता काँग्रेसकडून टीका टिप्पणी सुरू झाली आहे.
“ज्यांचे विश्र्वच लिंग, जात, धर्म यात गुंतलेले आहे त्यांना बुद्धिमत्तेपेक्षा हेच सारं महत्वाचं वाटणार, शेवटी तो त्यांच्या संघी संस्कारांचा दोष. माणसाचे कर्तुत्व हे त्याच्या कामावरुन ठरते, ना की लिंगावरुन. पण बुद्धीभ्रष्ट झालेल्यांना हे कसं समजणार!” असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.
तर, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील मुनगंटीवार यांच्या या विधानावरून निशाणा साधला आहे. “बुध्दीमत्ता व लैंगिकता यांचा संबंध नाही हे देशाला बुरसटलेल्या विचारांच्या अंध:कारात घेऊन जाऊ पाहणाऱ्या संघाच्या लोकांना समजणार नाही. कारण स्वतंत्र बुद्धी ही संघ विचारधारेसाठी घातक आहे. जगात प्रचंड सकारात्मक व प्रगतीशील बदल घडवणारे अनेक वैज्ञानिक, विचारवंत, चित्रकार हे समलैंगिक होते.” असं सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
LGBTQ समाजाबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “एखाद्या जनावरासोबत…”
“समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का? कोणी व्यक्ती मी समलैंगिक आहे, मला समलैंगिक संबंध ठेवण्याचं आकर्षण आहे असं लिहून देईन का? हे कोण सिद्ध करणार सचिव, मंत्री, राज्यमंत्री? तुम्ही सिद्ध करणार आहे का? याला समलैंगिक संबंधाचं आकर्षण आहे असं मंत्री उदय सामंत लिहून देणार आहेत का? यापुढे तर आणखी एक अलैंगिक संबंध आहेत. याची अजून कोणी परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबतही तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला तर तो सदस्य. आता तो जनावर त्याला प्रमाणपत्र देणार का की याने माझ्याशी संबंध ठेवला.” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.