आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार श्रीनिवास माने (धारवाड, कर्नाटक) यांनी नगर व शिर्डी मतदारसंघातील इच्छुकांची आज चाचपणी केली. शिर्डी राष्ट्रवादीला देऊन त्याबदल्यात नगर दक्षिणची जागा काँग्रेसला मिळावी, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. त्याचबरोबर नगर दक्षिणमधून बाळासाहेब विखे, त्यांच्या स्नुषा शालिनीताई, सत्यजित तांबे, ब्रिजलाल सारडा यांची नावे सुचवली. शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे आ. शरद रणपिसे (पुणे) इच्छुक असल्याचे समजले. आमदार भाऊसाहेब कांबळे, हेमंत ओगले, प्रेमानंद रूपवते यांच्याही उमेदवारीची मागणी झाली. लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे काँग्रेसने लढवावी, अशीही मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने इच्छुकांची माहिती घेण्यासाठी नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार अशा ८ मतदारसंघांसाठी माने यांची निरीक्षक नियुक्ती केली आहे. त्यांनी आज नगरच्या सरकारी विश्रामगृहावर भेटी घेतल्या. या भेटीतही जिल्ह्य़ातील थोरात-विखे गटातील मतभेदाचे प्रदर्शन झाले.    

Story img Loader