महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली आहे. त्यामुळे पदमुक्त व्हायचं आहे असं त्यांनी ठरवल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. यावर राजकीय वर्तुळातून विशेष करून महाविकास आघआडीच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी म्हटले की, “काँग्रेसने अनेकदा राज्यपालांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. संविधानिक व्यवस्थेच्या एका राज्याचे आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर ते बसलेले होते. परंतु सातत्याने संविधानिक व्यवस्थेचाही अपमान करणं, या राज्याच्या महापुरुषांचा अवमान करणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने अवमानात्मक बोलणं, अशा व्यवस्थेच्या राज्यपालांना तातडीने हटवावे. राज्यपाल भवन भाजपा भवन झालं, अशा पद्धतीच्या आम्ही भूमिका मांडल्या आहेत. राष्ट्रपतींकडे आम्ही लेखी तक्रारी केल्या आहेत.” एबीपी माझाशी ते बोलत होते.
हेही वाचा – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा
याशिवाय, “भाजपाला त्यांना इथेच ठेवायचं होतं आणि महापुरुषांचा सातत्याने अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हे राज्यपाल उद्या जाण्याऐवजी आजच गेले पाहिजे ही आमची भूमिका होती. आमची तर त्यांचा राजीनामा नाही असंच हाकललं पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका होती. आज ते जाऊ इच्छितात तो भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. अशा विचारांची व्यक्ती या पदावर बसणं हा खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचा अपमानच होता. आता ते जात असतील तर त्यांच्या जाण्याचं स्वागतच आहे.” असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे राज्यपालांनी पत्रात? –
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.