देशात सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत असल्याची कबुली देत नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लोकसभा उमेदवारीच्या स्पध्रेतून आपण माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. कोणतीही बंडखोरी करणार नाही, असे सांगतानाच काँग्रेस ज्या कार्यकर्त्यांला उमेदवारी देईल त्याचा प्रामाणिक प्रचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गत निवडणुकीत खतगावकर ७५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसच्या ज्या खासदारांना ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले, अशांना पुन्हा उमेदवारी देण्याचे काँग्रेसने स्पष्ट केले होते. परंतु नांदेड त्यास अपवाद ठरले. खतगावकर यांच्याबाबत अनुकूल वातावरण नाही, असा प्रचार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी केला होता. त्यामुळे खतगावकरांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होते. एकीकडे अशोक चव्हाण हे पालकमंत्री डी. पी. सावंत, अमिता चव्हाण यांच्यासह स्वतच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे खतगावकरांना उमेदवारी मिळणार नसल्याने प्रसारमाध्यमांत वेगवेगळ्या चच्रेला उधाण आले होते; परंतु स्वत: खतगावकर यांनीच पत्रकार बैठक घेऊन सर्व वादविवादांना पूर्णविराम दिला.
देश व काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या स्पध्रेतून आपण बाहेर पडत आहोत. गेल्या ३५ वर्षांपासून काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करताना आपण कधीही गटबाजी केली नाही. उलट आपल्या समर्थकांवर वेळोवेळी अन्याय झाला. मी आजपर्यंत प्रामाणिक राहिलो. राजकारणातील चढ-उतार अनुभवले. १९८५मध्ये मला उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी ती बदलली, तरीही बंडखोरीचा विचार माझ्या मनात आला नाही. काँग्रेसमध्ये आपण कधीही गटबाजीचे राजकारण केले नाही. या निवडणुकीत आपण उभे राहणार नसलो, तरी तो राजकीय संन्यास नाही. गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत जिल्ह्यातील काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू शकलो, याचे समाधान आहे.
दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे अनेक साथीदार ऐन निवडणुकीच्या तोंडावर बदलले. पण आपण १९८०, १९८४ च्या निवडणुकीत मुख्य प्रचारक म्हणून काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न केले. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने आपण नाराज नाही. काँग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही खतगावकर यांनी दिली असली, तरी त्यांच्यावर झालेला अन्याय ते लपवू शकले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा