मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या वतीने दंगलीतील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना अर्थसाहाय्य देण्याचे जाहीर केले असले तरी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही अर्थसाहाय्य करण्याचे संकेत गुरुवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले. सहा जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीनंतर शहरातील मच्छिबाजार भागातील वातावरण बऱ्यापैकी शांत झाले आहे. दंगलग्रस्त भागाला भेट देणाऱ्या राजकीय नेत्यांची व मंत्र्यांची रीघ लागली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री व गृहमंत्री येऊन गेल्यानंतर गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व आदिवासी विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी धुळ्याला भेट दिली. या वेळी माणिकराव गावित यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विश्रामगृहातील दालनात त्यांच्या भावना समजून घेतल्या. दंगलीत पोलिसांकडून अतिरेक झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही या वेळी ठाकरे यांनी दिला. पोलीस दल सक्षम बनविताना कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मृतांच्या नातेवाईकांना आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मदत जाहीर केली असली तरी काँग्रेसच्या वतीने अर्थसाहाय्य करता येऊ शकेल काय हेही पाहण्यात येईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच ठाकरे यांनीही दंगलग्रस्त भागाकडे फिरकणे टाळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांनी दंगलीची माहिती घेतली. काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, सुभाष देवरे, मधुकर गर्दे, युवराज करनकाळ यांसह जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे या वेळी उपस्थित होते.

Story img Loader