मोठी महत्त्वाकांक्षा मनात बाळगून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर नेत्यांच्या वारसदारांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे जिल्हय़ात वारसदार विरुद्ध कार्यकर्ता अशा महत्त्वपूर्ण लढती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसने अप्रत्यक्ष छुपी युती करून राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणण्याची रणनीती आखली आहे. परिणामी भूम, परंडा या तालुक्यात कधी काळी सशक्त असलेली काँग्रेस आता मरणासन्न झाली आहे. यंदा सामान्य मतदार नेत्यांच्या वारसदारांना स्वीकारतात की संघर्षांतून स्वतला सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांला बळ देतात यावर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण अवलंबून राहणार आहे.

जिल्हय़ात पद्मसिंह पाटील यांचे एकछत्री नेतृत्व होते. त्यांना शह देत सेना, काँग्रेस आणि भाजप यांनी सातत्याने विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न केले. त्यातून मागील जि. प. निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यात सर्व विरोधकांना यश आले. यंदाही अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि काँग्रेसने तसे प्रयत्न सुरू केले आहेत. यात भाजपला मात्र स्थान देण्यात आलेले नाही. कळंब, वाशी, भूम आणि परंडा या चार तालुक्यात तुलनेने कमकुवत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि उस्मानाबाद तालुक्यात शिवसेनेने झुकते माप पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे या छुप्या युतीला मतदार समर्थन देणार की राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला जाणार, याचा निर्णय निवडणुकीतून होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या वारसदारांनी राजकारणात सक्रिय सहभागी व्हावे, यासाठी सर्वच पक्षातील मातब्बर नेत्यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात सामान्य कार्यकर्ता विरुद्ध वारसदार अशा अटीतटीच्या लढतींकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. उमरगा तालुक्यात काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार बसवराज पाटील यांनी पुत्र शरण पाटील यांना पहिल्यांदाच िरगणात उतरविले आहे. त्यांना शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता असलेल्या नागेश पाटील याने आव्हान दिले आहे.

चुरशीच्या लढती

पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी असलेले जि. प. चे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील यांनी यंदा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यांना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव चालुक्य यांचे पुत्र अ‍ॅड. अभय चालुक्य यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.  दुसरीकडे दोन वारसदारांमध्ये एक सामान्य कार्यकर्ता, अशी लढत कुन्हाळी गटातून पाहावयास मिळणार आहे. शिवाजी चालुक्य यांचे पुतणे संताजी चालुक्य आणि खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र किरण गायकवाड यांनी एकमेकांच्या विरोधात कंबर कसली आहे. तिथे काँग्रेसने बसवराज पाटील समर्थक प्रकाश आष्टे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. सर्वपक्षीयांमध्ये आपल्या वारसदारासाठी प्रयत्न सुरू असताना भाजपही यात मागे राहिला नाही. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कैलास िशदे यांचे पुत्र दिग्विजय िशदे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपला रामराम करीत दत्तू कटकधोंड या कार्यकर्त्यांने शिवसेनेच्या माध्यमातून कडवे आव्हान उभे केले आहे. तिथे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत उडी घेतलेले शिवाजी गायकवाड हे देखील उमेदवार आहेत.

उस्मानाबाद तालुक्यात दोन महत्त्वांच्या लढतीकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी तेर या स्वतच्या गावातून उमेदवारी दाखल केली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करणाऱ्या कीर्तिमाला खटावकर या सर्वसामान्य कार्यकर्तीचा मुकाबला अर्चना पाटील यांना करावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे कैलास पाटील यांना ऐन वेळी उमेदवारी डावलण्यात आली. अजित पवार यांचे साडू, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे यांनी स्वतच्या मुलाला सांजा गटातून उमेदवारी मिळवून दिली. त्याविरोधात कैलास पाटील यांनी थेट आव्हान दिले आहे. तुळजापूर तालुक्यात देखील अशाच महत्त्वपूर्ण लढती यंदा पाहावयास मिळणार आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांचे पुत्र बाबूराव चव्हाण आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांचे पुतणे दीपक आलुरे यांनी एकमेकांच्या विरोधात शड्ड ठोकले आहे. आलुरे यांना राष्ट्रवादीने तर चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांच्यासमोर माजी उपनगराध्यक्ष दिलीप गंगणे यांचे चिरंजीव संदीप गंगणे यांनी सिंदफळ गटातून उमेदवारी दाखल केली आहे.

शिवसेना काँग्रेसची छुपी युती, दोन सदस्य संख्येवरून दोन अंकी आकडा गाठण्यासाठी भाजपची सुरू असलेली शर्यत आणि सर्वपक्षीय विरोधकांना एकतर्फी झुंज देत जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी सुरू असलेले राष्ट्रवादीचे प्रयत्न यात वारसदारांच्या समोर सामान्य कार्यकर्त्यांनी उभे केलेले कडवे आव्हान यंदा निवडणुकीत चुरस निर्माण करणार आहे.

निवडणुकीत चुरस

शिवसेना काँग्रेसची छुपी युती, दोन सदस्य संख्येवरून दोन अंकी आकडा गाठण्यासाठी भाजपची सुरू असलेली शर्यत आणि सर्वपक्षीय विरोधकांना एकतर्फी झुंज देत जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी सुरू असलेले राष्ट्रवादीचे प्रयत्न यात वारसदारांच्या समोर सामान्य कार्यकर्त्यांनी उभे केलेले कडवे आव्हान यंदा निवडणुकीत चुरस निर्माण करणार आहे.

Story img Loader