सांगली : काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे. यामुळे या दोन्ही पक्षापासून राष्ट्रीय समाज पार्टी समान अंतरावर राहणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाच्या प्रचारासाठी आणि जनतेची मते जाणून घेण्यासाठी पक्षाच्यावतीने सांगली लोकसभा मतदार संघामध्ये जनस्वराज्य यात्रा शनिवारी आटपाडीतून सुरू करण्यात आली असून आज या यात्रेचा शेवट जत तालुययात संख येथे करण्यात आला. जिल्ह्यातील विविध गावामधून या जनस्वराज्य यात्रेचे मार्गक्रमण झाले.

आणखी वाचा-“कानाखाली मारणाऱ्याला १ लाख बक्षीस”, परशुराम सेवा संघाच्या घोषणेनंतर भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

यात्रेदरम्यान, श्री जानकर यांनी विटा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सत्ता हाती असताना काँग्रेसने लहान पक्ष संपविले. आता तेच काम भाजप करीत आहे. भाजपला सत्ता मिळवत असताना लहान पक्षांची गरज भासली. आता मात्र सत्ता मिळताच याच पक्षाचे ओझे झाले आहे. आमचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष असूनही आम्हाला विचारले जात नाही. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्‍वास ठेवून युती केली. मात्र, आता विश्‍वास ठेवावे असे नेतृत्व भाजपकडे नाही. त्यांच्याशी युती करून आम्हीही चूकच केली.

काँग्रेसही गद्दार असून आता संधी असताना त्यांनी शहाणपणाने वागण्याची गरज आहे असे सांगून श्री जानकर म्हणाले, जो तो आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, आम्हालाही तेच करायचे आहे. सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पांढर्‍या कपड्यातील टगे असून सर्वसामान्य माणूस मात्र शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आगामी लोकसभेसाठी आपण कोणाशी युती अथवा आघाडी केलेली नाही. सांगली मतदार संघातून राष्ट्रीय समाज पार्टी स्वबळावर मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress is a traitor then bjp is a big traitor says former minister mahadev jankar mrj
Show comments