कुठलाही पराभव सत्य स्वीकारायला भाग पाडत असतो. हे सत्य पचविण्यासाठी ताकत लागते. त्यासाठी पोट रिकामे असावे लागते. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्यांची पोटे भरलेली आहेत. त्यामुळे विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार विलास मुत्तेमवारांनी मांडलेले सत्य पचवायचे तरी कुणी, हा या पक्षाच्या साऱ्या कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे.
लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केवळ विदर्भच नाही, तर राज्यातील काँग्रेस नेत्यांप्रती मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ठाकरे हे अतिशय आदर्शवत व कर्तृत्ववान नेते होते. चव्हाण व ठाकरे कुठेही गेले की, टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत व्हायचे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारायचा. बदनामीचा कोणताही डाग नसलेले मुख्यमंत्री व दीर्घकाळ खुर्ची सांभाळत निवडणूक जिंकणारे प्रदेशाध्यक्ष, अशीच दोघांची गणना व्हायची. लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर मात्र पराभवाचा फटका बसलेल्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या वृत्तीत आता बदल झालेला दिसतो. त्याचे प्रत्यंतर या पक्षातर्फे आयोजित प्रत्येक विभागीय मेळाव्यात येऊ लागले आहे. नागपूरचा मेळावा सुद्धा हेच दर्शविणारा होता. चव्हाण व ठाकरे या जोडगोळीचे आगमन झाले तेव्हा कार्यकर्त्यांनी साध्या टाळ्या सुद्धा वाजवल्या नाहीत. मग जयजयकार करणे तर दूरच राहिले. आता पराभूत नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लेखी चव्हाण व ठाकरे हे सर्वात निष्क्रीय ठरले आहेत. हे दोघे नेतृत्व करत राहिले तर विधानसभेत काही खरे नाही, अशी भावना उघडपणे बोलून दाखविली जात आहे. सामान्य मतदार पक्षापासून दूर गेला, त्याचे सारे खापर या दोघांवर फोडले जात आहे.
नागपूरच्या मेळाव्यात मुत्तेमवारांनी केलेल्या दणकेबाज भाषणाचा सूर सुद्धा तसाच होता. मला जनतेने नाकारले, आता तुम्हालाही नाकारणार तेव्हा सज्ज राहा, असा इशाराच त्यांनी दिला. हेच मुत्तेमवार निवडणूक प्रचाराच्या काळात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख लोकप्रिय व प्रदेशाध्यक्षांचा उल्लेख दमदार, असा करीत होते. एक पराभव एका नेत्याचे मतपरिवर्तन कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरणच मुत्तेमवारांनी या मेळाव्यात पेश केले. पक्षाच्या लोकसभेतील पराभवाला चव्हाण व ठाकरे जबाबदार आहेतच, पण ज्यांना हा पराभव चाखावा लागला त्यांची काहीच जबाबदारी नव्हती का, असा प्रश्न पडतो. या पराभवाला केवळ चव्हाण व ठाकरेच नाही, तर आपण सारे जबाबदार आहेत, अशी भूमिका दुर्दैवाने एकही नेता आज कार्यक्रमातून मांडताना दिसत नाही. उलट, प्रत्येक कार्यक्रमात एकमेकांचे कपडे फाडण्याचा उद्योग जाणीवपूर्वक केला जात आहे.
मेळावा अथवा कार्यक्रमात नेत्यांची अशी खिल्ली उडविली तर टाळ्या मिळतात, पण यातून बाहेर पडण्याचा तो उपाय आहे का, यावर कुणीही चिंतन करायला तयार नाही. मुळात पक्षाची अशी अवस्था होण्यास हे नेते, त्यांच्यात असलेले द्वंद, एकमेकांचा वचपा काढण्याची वृत्ती, कुरघोडीचे राजकारण, हे सारे जबाबदार आहे. रक्तात भिणलेल्या या गोष्टी आम्ही करतच राहू व पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडत राहू, अशीच दुटप्पी भूमिका काँग्रेसचे नेते आजही घेताना दिसतात. त्यामुळे पराभवातून शहाणपण येते, ही उक्तीच खोटी ठरविली जात आहे. येथील मेळाव्यात सर्वाना फैलावर घेणारे मुत्तेमवार गेल्या ३५ वर्षांपासून सत्तेत आहेत. ३५ वर्षांनंतर दिल्लीचा बंगला रिकामा करताना किती त्रास झाला, हे ते मोठय़ा वेदनेने सर्वाना सांगत होते. मात्र, असा पराभव स्वीकारण्यापूर्वीच आपण राजकारणात थांबायला पाहिजे होते, असे त्यांच्या मनात का आले नाही? शासकीय नोकरीचा काळ सुद्धा ३० वर्षांचा असतो. मग मुत्तेमवारांना सन्मानपूर्वक निवृत्ती घ्यावी, असे का वाटले नाही? जनतेनेच घरी बसवले तेव्हाच निवृत्ती, असा विचार प्रत्येक नेता करायला लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा