प्रदीप नणंदकर

लातूर : ‘औसाचे आमदार अभिमन्यू पवार निवडून यावे म्हणून अमित देशमुख यांनी जसे प्रयत्न केले तसेच आर्शीवाद पुढील निवडणुकीत निवडून येण्यासाठी असू द्यावेत, अशी जाहीर विनंती खासदार सुधाकर तुकाराम शृंगारे यांनी केली. त्यांच्या या विनंतीमुळे काँग्रेसचे नेते अमित देशमुख भाजपचे आमदार निवडून येण्यासाठी मदत करत होते, अशा जाहीर चर्चेला तोंड फुटले आहे.

२०१९च्या निवडणुकीत औसा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शृंगारेंच्या एका विनंतीमुळे अमित देशमुख यांच्या काँग्रेस निष्ठेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लातूरचे खासदार शृंगारे हे २०१९ च्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर पावणेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. त्यानी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला, असे असतानाही भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांना लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांचे आशीर्वाद का हवे आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

या जाहीर विनंतीमुळे आमदार अमित देशमुख भाजप नेत्यांना निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मदत करत होते आणि या पुढेही ते करतील, असा आशावाद शृंगारे यांना वाटत असल्याचे त्यांच्या विनंतीवरून स्पष्ट होत आहे. शृंगारे यांनी हे वक्तव्य बुधवारी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केले. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आमदार देशमुख व औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे तिघे  व्यासपीठावर होते. औसा विधानसभा  मतदारसंघात काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा भाजपचे नवखे अभिमन्यू पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत पराभव केला. काही जण दबक्या आवाजात लातूरच्या देशमुखांची छुपी रसद अभिमन्यू पवार यांना होती अशी चर्चा सुरू होती, ती शृंगारे यांनी जाहीरच  केली.

काय म्हणाले शृंगारे?

खासदार सुधाकर शृंगारे अमित देशमुख यांना उद्देशून म्हणाले, ‘भैय्या, आपली कधी भेट झाली नाही. आपण पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. मी तुमच्यासमोर पहिल्यांदाच बोलतो आहे. माझ्या बाबतीत तुम्ही काय चिमटे काढता याची मला भीती वाटत होती. मात्र, तुम्ही तसे काही केले नाही, मला चिमटेही काढता येत नाहीत. आमचे आमदार अभिमन्यू पवार यांना जसे आपण आशीर्वाद देता तसेच आशीर्वाद मलाही हवे आहेत.’

Story img Loader