एकीकडे भाजपाच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याचे म्हटले जाते. तर दुसरीकडे मी पक्षावर नाराज नाही, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी अनेकवेळा दिलेले आहे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर शिवसेना तसेच अन्य पक्षातील नेत्यांनी पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिलेली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे यांनीदेखील नुकतेच पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत आहे, असे विधान केले आहे. त्यानंतर विधानानंतर पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते १३ जानेवारी रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
पंकजा मुंडे हुशार, राजकीय परिस्थितीची ओळख
“पंकजा मुंडे मराठवाड्यातील भाजपाच्या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांनी अनेक चांगली कामे केलेली आहेत. मी त्यांना सभागृहात अनेक वर्षांपासून पाहात आलो आहे. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. कोणत्या पक्षात जावं आणि कोणत्या पक्षात नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यावा. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्या हुशार आहेत, समजदार आहेत. त्या राजकीय परिस्थिती जाणतात. त्यावर मी भाष्य करणे उचित नाही. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो हे त्यांनी ठरवावं,” असे भाष्य अशोक चव्हाण यांनी केले. कोणत्या पक्षात गेल्यावर जास्त राजकीय फायदा होऊ शकतो हे ओळखायला हवं, अशा अर्थाने अशोक चव्हाण यांनी वरील विधान केले.
हेही वाचा >>> “उर्फीला प्रसिद्ध करण्याची सुपारी…”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर काँग्रेस महिला नेत्याचा सवाल
शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे काय म्हणाले?
शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी बोलताना सुनील शिंदे म्हणाले, “पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपाच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतंय. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >>> “भाजपाचं नेमकं धोरण काय?”, सत्यजीत तांबेंवर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “युवानेते म्हणून…”
पंकजा मुंडे मातोश्रीच्या दाराने कधीही जाणार नाहीत
पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी पंकजा मुंडे कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. “मातोश्रीचं दार त्यांच्यासाठी उघडं असलं तरी त्या दाराने पंकजा मुंडे कधीही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचे घर आहे. मनातले मांडे मनातच राहणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत राजकीय वक्तव्यं करण्यात येतात. त्याला काहीही अर्थ नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.