पीक विमा कंपन्या सरकारचे ऐकत नाही, अशी तक्रार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडे केली. नांदेडमध्ये आज कृषीमंत्र्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीसंदर्भात विभागीय बैठक बोलवली होती. या बैठकीत अशोक चव्हाणांनी पीक विमा संदर्भातील तक्रारींचा पाढा वाचला. पीक विमा कंपन्या शेती नुकसानाचे त्यांच्यामार्फत केलेले पंचनामेच ग्राह्य धरतात, सरकारच्या पंचनाम्यांना नाकारतात, अशी तक्रार चव्हाणांनी कृषीमंत्र्यांकडे केली. शेतकऱ्यांना मोबदलाही पीक विमा कंपन्यांच्या पंचनाम्यानुसारच दिला जातो, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाणांकडून करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार पीक विम्याचा जवळपास ९५ टक्के प्रिमियम भरतात. असे असतानाही सरकारचा पंचनामा ग्राह्य धरला जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली १३ हजार ६०० रुपयांची मदत अत्यल्प आहे. ही मदत तीन हेक्टरपर्यंत शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आल्याने राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात बरीच जनावरे दगावली आहे. याबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी चव्हाणांनी यावेळी केली. नांदेड कृषी विद्यापीठाची जुनी मागणी चव्हाणांनी कृषीमंत्र्यांपुढे लावून धरली.