आपणास काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचलं गेलं, असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केला. युवक काँग्रेस प्रदेशाध्यपदाची कारकीर्द संपल्यापासून आपण संघटनेत काम करण्याची संधी मागत होतो, पण तसे घडलं नाही, असेही सत्यजीत तांबेंनी म्हटलं. यावर आता माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “सत्यजीत तांबेंना काँग्रेस पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रश्न येतो कुठं. तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून लढायचं होतं, तर कोणी नाकारलं होतं. डॉ. सुधीर तांबे हे विद्यमान आमदार होते. वडिलांच्या जागी मला उमेदवारी द्या, म्हटलं असतं कोणीच विरोध केला नसता. पण, पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबेंच्या नावाला संमती दिल्यावर, अचानक उमेदवारी मागणं हा बदल शक्य नाही. त्यामुळे सुरुवातीलाच उमेदवारी मागितली असती, तर विषय झाला नसता.”
“नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत जे काही घडलं ते योग्य नाही. कारण, हा मतदारसंघ काँग्रेसचा होता. मात्र, निवडणूक लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कळवावं लागतं. राज्यातून दिल्लीत प्रस्ताव गेल्यावर काँग्रेस अध्यक्ष त्यावर शिक्कामोर्तब करतात. मात्र, उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच सर्व काही करायला हवं होतं,” असं अशोक चव्हाणांनी सांगितलं.
हेही वाचा : भाजपला ब्राह्मण उमेदवारांचे वावडे? ‘कोथरूड’ पाठोपाठ ‘कसब्या’तही डावलले
“सत्यजीत तांबेंना अपक्ष लढायचं होतं, तर सांगायला हवं होतं. कारण, समोर विरोधक भाजपा आहे. त्यामुळे आपल्यात कोणतेही संदिग्ध वातावरण राहणं योग्य नाही. पारदर्शकता राहिली असती, तर संदिग्धता टाळता आली असती,” असेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.