Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress : “अशोक चव्हाण यांचा निर्णय धक्कादायक, दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. अन्यायकारक यासाठी कारण जे इमानदार आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांना याचे दुःख वाटते. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी पक्षाला उभारी देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशावेळी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम यानिमित्ताने झाले आहे. अशोक चव्हाण यांना चौकटीबाहेर जाऊन आजवर अनेक पदे दिली गेली. पक्षाने त्यांना मोठं केलं. असं एकही पद नाही, जे अशोक चव्हाण यांना मिळालं नाही. आता ते कार्यकारी समितीचे अध्यक्षही आहेत. अशावेळी अशोक चव्हाण यांनी जाणं, हे दुर्दैव आहे”, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केली.
विलास मुत्तेमवार यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. २००८ साली विलासराव देशमुख यांच्यानंतर वरिष्ठांना डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ४२ एवढे होते. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदे चव्हाणांना दिली. त्यांचे वडील दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, केंद्रातही त्यांनी अनेक पदे भूषविली होती. हे सर्व ते कसे काय विसरू शकतात? ज्या कुटुंबाला एवढं सर्व दिलं, त्याच कुटुंबाने असे करावे, यामुळे अनेक कार्यकर्ते दुःखी झाले आहेत. सामान्य कार्यकर्ते नेत्यांच्या एका शब्दावर लाठ्या खातात. केसेस अंगावर घेतात, त्या कार्यकर्त्यांसमोर यांचा त्याग काहीच नाही, असे टीकास्र मुत्तेमवार यांनी सोडले.
राहुल गांधींशी चर्चा केलीत का? पाचव्यांदा प्रश्न आल्यावर अशोक चव्हाणांचा सूचक इशारा
मुत्तेमवार पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण गेल्याने काँग्रेस संपणार नाही. याआधी असे बरेच लोक काँग्रेस सोडून गेलेले आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काँग्रेस नेते पक्ष सोडत आहेत का? असा प्रश्न विचारला असता मुत्तेमवार म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले कदाचित चुकलेही असतील. पण त्यामुळे पक्ष सोडून जाणे, हा काही पर्याय नाही. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना तेही परिपूर्ण नव्हते. त्यांच्याबद्दलही तक्रारी होत्या. तसेच इतर राज्यातील काँग्रेस नेते पक्ष सोडून चालले आहेत, ते काय नाना पटोले यांच्यामुळे जात नाहीत, असा टोलाही मुत्तेमवार यांनी लगावला.
भाजपाकडे काही नीती राहिलेली नाही. बाहेरून लोक आणून ४०० पार करण्याचा त्यांचा विचार आहे. पण लोक हे अजिबात होऊ देणार नाही. दीड वर्षांपूर्वी भाजपाने शिवसेना पक्ष फोडला. मागच्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली. त्यांना सरकारमध्ये घेतले. नुकतेच नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून बाहेर काढून त्यांच्यासह सरकार स्थापन केलं. भाजपा जर स्वबळावर सत्तेत येणार आहे, तर मग हे कशासाठी सुरू आहे? असा सवाल विलास मुत्तेमवार यांनी उपस्थित केला.