मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर टोलनाक्यावर रविवारी ( ७ जानेवारी ) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं नागरिकांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. याचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आला. खालापूर टोलनाक्यावरून जाताना राज ठाकरेंनी वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यानंतर राज ठाकरेंनी स्वत: गाडीतून उतरून वाहनांना टोलनाक्यावरून सोडलं. तसेच, टोलनाक्यावरील अधिकाऱ्यालाही राज ठाकरेंनी खडेबोल सुनावलं. यावरून काँग्रेसने राज ठाकरेंवर टीका केली आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे मुंबईकडे निघाले होते. यावेळी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे येताना खालापूर टोलनाक्यावर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिवळ्या रेषेच्या बाहेर वाहनांच्या रांग गेल्यास टोल न घेता वाहने सोडली जातात. मात्र, खालापूर टोलनाक्यावर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा पाहून राज ठाकरे संतापले. राज ठाकरेंनी स्वत: गाडीतून उतरत वाहनांना टोलनाक्यावरून सोडलं. यावेळी ठाकरी शैलीत टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला राज ठाकरे यांनी दम दिला आहे.
“एक जरी गाडी अडवली तर याद राखा”
“पुन्हा बांबू लावला, तर सगळ्यांना बांबू लावेन मी, एक जरी गाडी अडवली तर याद राखा. कुठपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात माहिती आहे का?” असे खडेबोल राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला सुनावले.
“धरसोड वृत्ती राज ठाकरेंनी सोडून दिली पाहिजे”
याबाबत नाशिकमध्ये प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना विचारला असता त्यांनी राज ठाकरेंचा ‘स्टंट’ असल्याचं म्हणत टीकास्र सोडलं. “धरसोड वृत्ती राज ठाकरेंनी सोडून दिली पाहिजे. जनतेच्या हिताचं आणि चांगले रस्तेही झाले पाहिजेत, असं धोरण राज ठाकरेंनी सरकारसमोर मांडलं पाहिजे. टोलसमोर उभे राहून काही लोकांना मोफत सोडणे, हा स्टंट आहे,” असं अतुल लोंढेंनी म्हटलं.
“भाजपाच्या ३ ते ४ जागा निवडून आल्या तरी खूप”
“महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरळीत सुरू आहे. ९ जानेवारीला दिल्लीत जागावाटबाबत चर्चा होणार आहे. सगळ्या गोष्टी चर्चेतून सुटतील आणि जागावाटप व्यवस्थित होईल. महाराष्ट्रात भाजपाच्या ३ ते ४ जागा निवडून आल्या तरी खूप आहेत,” असा टोलाही अतुल लोंढेंनी लगावला आहे.