मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवावे, अशी मागणी केली जात आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राची बदनामी थांबवा आणि माफी मागा. नाहीतर मोठे आंदोलन करु, असा इशारा लोंढेंनी राज्यपालांना दिला आहे.
द्वेशापोटी त्यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप
राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाची प्रतिमा धुळीस मिळवण्याचा चंग बांधलेला दिसू येत आहे. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राची आई मानल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राबाबत वक्तव्य केलं. एका विशिष्ट द्वेशापोटी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी
महाराष्ट्राची संस्कृती आणि लोकांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची प्रवृत्ती यामुळे इतर लोक प्रगत झाले आहेत. हे राज्यपालांनी लक्षात ठेवावं. नाहीतर हीच लोकं गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रगत का झाली नाहीत? असा सवालही लोंढे यांनी राज्यपालांना विचारला. आपण महाराष्ट्राची बदनामी थांबवावी आणि लवकरात लवकर महाराष्ट्राची माफी मागावी नाहीतर तुमच्याविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा लोढेंनी कोश्यारींना दिला आहे.
पंतप्रधानांना इशारा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. तरीसुद्धा तुम्ही अशा महाराष्ट्रद्रोही व्यक्तीला राज्यपाल पदावर ठेवणार असाल, तर तुम्हालासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन करायला यायचा काही अधिकार राहणार नसल्याचा इशारा अतुल लोंढेनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.