एमआएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युती करण्याची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जलील यांच्या या प्रस्तावानंतर आता राज्यात नवी समिकरणे तयार होणार का ? असे विचारले जात आहे. जलील यांच्या या खुल्या ऑफरनंतर शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलील यांच्या प्रस्तावावर भाष्य केलंय. त्यांनी आम्हाला कुठलाच कट्टरवाद मान्य नाही, आम्ही सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारे आहोत, असं म्हटलंय. टीव्ही ९ मराठीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले ?
बाळासाहेब थोरात यांनी एमआयएमशी युती करण्यावर थेटपणे भाष्य केलेलं नाही. मात्र “आम्हाला कोणताच कट्टरवाद मान्य नाही. कोणत्याच समाजाचा, धर्मचा कट्टरवाद आम्हाला मान्य नाही. आम्हाला सर्वधर्मसमभाव हवा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे तत्त्वज्ञान आम्हाला मान्य आहे. त्याच तत्त्वज्ञाने आम्ही पुढे जात आहोत. कोणताच कट्टरवाद आम्हाला मान्य नाही,” असे थोरात म्हणाले आहेत.
…तर जलील यांचे स्वागत आहे
तर दुसरीकडे जलील एमआयएम पक्षाचा राजीनामा देत असतील तर त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यास काहीही हरकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यांनी म्हटलंय. “एमआयएमचा राजीनामा देऊन ते आले तर त्यांना घ्यायला तयार आहोत. एमआयएम नाही तर त्यांना घ्यायला आनंद आहे. राष्ट्रवादीच्या धोरणानुसार त्यांनी काम केलं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांना ताबडतोब घेणार,” असं भुजबळ यांनी म्हटलंय.
शिवसेनेने ऑफर धुडकावून लावली
दरम्यान, एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जलील यांची युतीची ऑफर धुडकावून लावली आहे. “एमआयएम आणि भाजपाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. जे आधीच भाजपाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही,” असंही राऊत यांनी म्हटलंय.