कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांशी चर्चा करत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहटीला पर्यटन करत होते, अशा शब्दांत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“सीमाभागातील कानडी अत्याचाराबाबत मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे कळत नाही. त्यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सीमावादावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण झाला आहे. मात्र, मुख्यमंत्री गप्प बसलेले बघायला मिळते आहे. हे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
हेही वाचा – गुजरात भाजपा राखेल, काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले; संजय राऊतांचं मत
यावेळी बोलताना त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीकाही केली. “जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात दाखल सीमाप्रश्नाच्या प्रकरणासंदर्भात वकिलांशी चर्चा करत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहटीला पर्यटन करत होते, असे ते म्हणाले. सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री गंभीर आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे धोरण, भूमिका स्पष्ट करावी. तसेच या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक बोलावून याप्रकरणी सर्वांशी चर्चा करावी”, अशी मागणीही त्यांनी केली.