संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे ) या दोन पक्षांत गेल्या काही दिवसात उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांना काल दिल्लीत पाचरण करण्यात आले होते. त्या सर्वांसमोर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली. या नव्या जबाबदारीने थोरात यांचे पक्षाअंतर्गत वजन वाढण्याचे सांगितले जाते.

महाविकास आघाडी मध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना जागा वाटपाच्या कारणावरून खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांना लक्ष केले. पटोले यांनीही त्यांना उत्तर दिल्याने मोठे शाब्दिक युद्ध रंगले. त्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले. नंतर या उभयतांनी माध्यमांसमोर येत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हे पान उलटत नाही तोच खासदार संजय राऊत दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही गुप्त भेट झाल्याची बातमी पसरली. एवढेच नाही तर स्वबळावर लढण्याची भाषाही बोलली गेली. या प्रमुख घटनांसह अन्य छोटे मोठे खटके या दोन महत्त्वाच्या पक्षात उडाल्याने महाविकास आघाडी संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली.

हेही वाचा : रत्नागिरीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार? विद्यमान आमदारांना विधानसभा जड जाण्याची शक्यता

राज्यातील या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना काल दिल्लीत पाचारण केले. सर्वांशी चर्चा केल्यानंतर समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला. थोरात यांनीही उत्साहाने नवी जबाबदारी स्वीकारत आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. नंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळाली.

मागचा अनुभव गाठीशी..

थोरात हे शांत, संयमी व तोलून मापून बोलणारे अनुभवी नेते समजले जातात. माध्यम स्नेही नसल्याने ते काहीसे मागे पडतात अशी कबुली काँग्रेस मधीलच त्यांचे समर्थक देत असतात. २०१९ मधील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी आकाराला आणण्याचे महत्त्वाचे काम खासदार राऊत, आमदार थोरात यांनी शरद पवार यांच्या साथीने केले होते. त्यावेळी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास सुरुवातीला प्रतिकूल असलेल्या दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींची मने वळविण्यात थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हीच बाब ओळखून आता पक्षश्रेष्ठींनी त्यांना समन्वयाची जबाबदारी दिली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत परत विश्वासाचे वातावरण निर्माण करत पक्षासाठी यशस्वी वाटाघाटी करण्यात आता थोरात यांची खरी कसोटी लागणार आहे.

हेही वाचा : सातारा: रक्कम लांबविण्याचा बनाव पोलिसांकडून उघडकीस

पटोले यांना चाप..

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मूलतः आक्रमक स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. भाजप मधून त्यांचा झालेला काँग्रेस प्रवेश, विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष पद आश्चर्यकारकरीत्या सोडणे आणि अन्य काही गोष्टींमुळे काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊत आणि त्यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे तत्कालीन कारण पटोले यांना महागात पडले आहे.