राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जागावाटपाची तयारी देखील सुरु केली आहे. याचबरोबर सर्वच नेते मंडळी सध्या विविध मतदारसंघाचा दौरा करत आढावा घेत आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून सभा मेळावे, बैठका घेण्यात येत आहेत. याचवेळी सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं दिसत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातही राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचे राजकारण नेहमी चर्चेत असते. शिवाय भाजपा नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष आणि टीका-टिपण्णी कायम चर्चेत असते. आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज श्रीरामपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. “बाप कितीही मोठा असो, पण वारसदार चांगले असावेत”, असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
हेही वाचा : Maharashtra News Live : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं, एवढ्या जागा लढविणार?
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“बाप कितीही मोठा असो, पण वारसदार चांगले असावेत”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता हा टोला कोणाला लगावला? याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “लोक चांगले असले की कार्यक्रम चांगला होतो. काही असलं तरी करण ससाणे असतील किंवा तुम्ही त्यांना मानणारे सर्व मंडळी असताल. संघर्ष आहे, अडचणी आहेत, पण तरीही चांगलं काम करता येतं. श्रीरामपूरमध्ये काहीच सोप नाही हे मला देखील माहिती आहे. त्यातच आम्ही लोक येऊन टीका करत असतो. तरी तुम्ही टिकून राहता”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.