हिंगाली : कॉग्रेसमध्ये नवी बांधणी करणारे दमदार नेते अशी दिवंगत राजीव सातव यांची ओळख. पण त्यांच्या निधनानंतर कळमनुरीसह हिंगोली जिल्ह्यातील कॉग्रेस शक्तीहिन होत असल्याचे दिसून येत आहे. आता कॉग्रेसचे भाऊ पाटील गोरेगावकर हेही शिवसेनेमध्ये जाणार आहेत. सातव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस कॉग्रेसने आमदार केल्यानंतर जिल्ह्यातील कॉग्रेसमध्ये धुसफूस सुरूच होती.

दिवंगत खासदार राजी सातव व माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यात सुरुवाती पासूनच गटबाजी होती. २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत भाऊ गोरेगावकर यांना उमेदवारी मिळू नये म्हणून सातव यांनी अप्रत्यक्ष जोरदार प्रयत्न केले होते. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी आमदार प्रज्ञा सातव यांचा कार्यकाळ सुरू झाला. त्यांचे व भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यातही बेबनाव कायम राहिला. माणिकराव ठाकरे यांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणले होते पण तेही फार काळ टिकला नाही.

राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांच्याकडे पक्षाची सूत्र आली.मात्र त्यांच्यावर एककल्ली स्वभावावर टीका करुन कॉग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते आता शिवसेना (एकनाथ शिंदे ) गटात सामील झाले. त्यानंतर माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मगर, केशव नाईक, कैलास सोळंके, एस. टी राठोड, पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पतंगे,कळमनुरीचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल यांचा समावेश आहे. आता गोरेगावरकर यांच्याबरोबरही अनेक कार्यकर्ते शिवसेना (एकनाथ शिंदे ) यांच्या पक्षात जाणार आहेत. १९ मार्च रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.