अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना आपल्याबरोबर घेऊन पक्षात उभी फूट पाडली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली. आता त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांकडूनही यावर भाष्य केलं जात आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीतील बंडाबाबत मोठा दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “फूट अनपेक्षित होती हे गैर आहे. ही फूट अपेक्षित होती. अनेकांना माहिती होतं की, शरद पवारांचे फूट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी समजावण्याचाही प्रयत्न केला, पण अजित पवारांना थांबायचं नव्हतं. फुटण्यासारखं काही कारणही नव्हतं. कारण त्यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती, पदं होती.”
“प्रदेशाध्यक्षपदावरून फूट हे काही कारण नाही”
“प्रदेशाध्यक्षपदावरून फूट हे काही कारण नाही. अजित पवारांना शिंदे-फडणवीसांबरोबर जायचं होतं. त्यांना का जायचं होतं ते काल शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. पवारांनी पत्रकार परिषदेत अनेकांची नावंही सांगितली आहेत. राष्ट्रवादीतील फूट महाराष्ट्रातील वातावरण ढवळून काढणारी होती,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : VIDEO: अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “एक दिवसाआधीच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना…”
“राष्ट्रवादीचे अनेक लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत”
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “राष्ट्रवादीचे अनेक लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. सत्ता गेली त्या दिवशीपासून राष्ट्रवादीतील धुसफूस वाढली. अजित पवारांचा कल सत्तेकडे होता हे तेव्हा अनेकांच्या लक्षात आलं होतं. हे मी स्पष्टपणे सांगतो आहे. असं असलं तरी शरद पवारांनी हे सावरण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पवारांच्या सांगण्याच्या आणि समजावण्याच्या पलिकडे होतं हे स्पष्ट झालं आहे.”
हेही वाचा : “अजित पवार शिंदे-फडणवीसांबरोबर जातील याचा अंदाज…”, राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवारांचं मोठं विधान
“आता काँग्रेसलाच सशक्त पर्याय घेऊन लोकांसमोर जावं लागेल”
“शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून ते महाविकासआघाडीबरोबर राहतील असं दिसतं आहे. आता काँग्रेसला सर्वांची मोट बांधण्याचं काम करावं लागेल आणि मविआच्या रुपाने एक सशक्त पर्याय म्हणून लोकांसमोर जावं लागेल. त्याची तयारी आम्ही करतो आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.