मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. तर भाजपाकडे १०५ आमदार असूनही देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं, या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी टिप्पणी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रातील भाजपाच्या मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केल्याची टीका कन्हैया कुमार यांनी केली. दरम्यान, त्यांनी अमृता फडणवीसांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली.
“देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केला”
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कन्हैया कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला. आजकाल देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या (अमृता फडणवीस) गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात. मला फडणवीसांची दया येते, अशा शब्दांत कन्हैया कुमार यांनी खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’ असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत आहे. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपामध्ये येताच अचानक पवित्र होतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा- “एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहणार”, फडणवीसांनी सांगितला ‘प्लॅन बी’, म्हणाले…
ड्रग्जचे साठे अदाणींच्याच बंदरात कसे?
राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणावरही कन्हैय्या यांनी भाष्य केलं. तरुणाईच्या मेंदुला नियंत्रित करण्याचं काम ड्रग्ज करतात. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांना भोवतालचं भानच राहत नाही. त्यामुळे हे ड्रग्ज तरुणाईला खाईत लोटण्याचं काम करत आहेत. त्यांना घर, कुटुंब, समाज, देश याची कसलीच शुद्ध राहत नाही, असं कन्हैय्या कुमार म्हणाले. त्याचसोबत ड्रग्जचे अतिप्रचंड साठे अदाणी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा- “अजित पवारांचा निर्णय योग्यच, त्यांनी संघर्ष…”, ‘त्या’ निर्णयावर शरद पवारांचं मोठं भाष्य
आर्थिक धोरण बदलण्याची गरज
देशात रोजगार निर्मिती वाढवायची असेल, तर देशाचं आर्थिक धोरण बदलण्याची गरज कन्हैय्या कुमार यांनी बोलून दाखवली. आज आपण चीनमधून आलेल्या गोष्टी वापरतो. पण आपल्याकडील उत्पादकता आपण मारली आहे. सेवा क्षेत्रासोबतच उत्पादनावर भर दिला, तरच देशात रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी एककेंद्रीयता मोडावी लागेल, असंही कन्हैय्या कुमार म्हणाले. आज देशात सगळ्याच क्षेत्रांमध्ये एककेंद्री व्यवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळत नाहीत. स्पर्धेसाठी समान संधी तयार केली, तरच नवे उद्योजक आणि उद्योग उभे राहतील. त्यातूनच रोजगारनिर्मिती होईल, असंही ते म्हणाले.