लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. आता काँग्रेसला वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असे माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र विधानसभा निवडणुका समोर असताना घेतलेली ही भेट महत्त्वाची ठरते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी मोदी आणि शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्याबाबत आपण समाधान व्यक्त त्यांना भेटलो असे माणिकराव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.  मात्र या दोघांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसते आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला देशभरात दारूण पराभव सहन करावा लागला. महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. या पराभवाच्या धक्क्यातून सावरत आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जाते आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी जेव्हा यासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा ही एक सदीच्छा भेट होती हे सांगत याबाबत फार काही बोलणे माणिकराव ठाकरे यांनी टाळले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदीविरोधी भूमिका घेत त्यांना निवडून देऊ नका अशी भूमिका आपल्या दहा सभांमधून घेतली होती. या सभांचा परिणाम होईल असंही वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही उलट भाजपा आणि शिवसेना युतीला ४१ जागा मिळाल्या. आता विधानसभेच्या वेळी राज ठाकरे आघाडीसोबत जाणार का? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आजच्या भेटीत काय चर्चा झाली त्यावर काही तर्क लढवले जात आहेत.