राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेसोबतच इतरही पक्षांमधील नेतेमंडळी या युतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील नेत्यांची नावं घेतली जात आहेत. यात सर्वाधिक चर्चा ही काँग्रेसचे नांदेडमधील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ती’ भेट झाली की नाही?

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. या भेटीसंदर्भातील वृत्त दोन्ही नेत्यांनी फेटाळून लावलं असून अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, तरीदेखील या दोघांची भेट झाली असून त्यात अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर चर्चा झाल्याचे दावे केले जात आहेत.

दरम्यान, माणिकराव ठाकरेंनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “अशोक चव्हाणांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे. काल नांदेडच्या बैठकीत अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं की या वावड्या उठवल्या जात आहेत. त्या चुकीच्या आहेत. माध्यमांनाही त्यांनी हे सांगितलं आहे. भारत जोडो यात्रेबाबत अशोक चव्हाण आणि मी एकत्र बैठक घेतली. काँग्रेस पक्षाच्या ट्रेनिंग कॅम्पविषयी आम्ही चर्चा केली. अशोक चव्हाण स्वत: उद्धाटक म्हणून या ट्रेनिंग कॅम्पला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहेत. प्रत्यक्षात तसं काहीही नाही”, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.

पक्षांतराच्या चर्चेचा गुंता वाढताच…चर्चा होतेच कशी, हा संभ्रम मलाही – अशोक चव्हाण

“अशोक चव्हाणांबद्दल अपप्रचार केला जात आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचं नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे बघितलं जातं. ते असा विचार करूच शकणार नाहीत. विरोधी पक्ष त्यांच्याबद्दल अपप्रचार करत आहे”, असंही ते म्हणाले.

निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राहील का?

“लोकसभा आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडी ठेवण्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेणार आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा अध्यक्ष व स्थानिक नेत्यांना देण्यात आलेला आहे”, असंही ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader manikrao thakrey on ashok chavan joining bjp rno news pmw