ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला आहे. परंतु लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. इंग्रजांनी हुकूमशाही कारभार केला, त्याला जनता घाबरली नाही. आता स्वंतत्र भारतात भाजपा इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच पद्धतीने कारभार करू पाहत आहे, पण ते आता शक्य नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाडतानाही भाजपाकडून याच पद्धतीचा अवलंब केला. भाजपाने कारवाईच्या कितीही धमक्या दिल्या तरी महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत.

हेही वाचा- राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट, सिंचन घोटाळ्याचाही केला उल्लेख

विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. त्यावर सरकारकडे उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देऊन विरोधकांना घाबरवण्याचे राजकारण केले जात आहे. ईडी सरकारची उलटी गिनती सुरू झाली असून जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा- “…त्या सर्वांना मंत्रीपद मिळणारच” बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचं विधान चर्चेत

विदर्भातील अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यात तातडीने मदत पोहचवा…
वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शिवारात पाणी साचल्याने धान, पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मोहाडी, लाखांदूर, पवनी या तालुक्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. येथे त्वरित मदतकार्य पोहोचवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. अतिवृष्टीमुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली भागात पाणी साचले आहे, घरे पडली आहेत, शेती उद्धवस्त झाली आहे, अन्नदाता अडचणीत आला आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Story img Loader