राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे, परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली, पण ती तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधीमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने गावे उद्धवस्त झाली आहेत. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले, जनावरे वाहून गेली आहेत. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे, पण राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहोत. पण सरकार शेतकरी प्रश्नांवर बोलण्यास तयार नाही. पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचेही प्रावधान नाही.

हेही वाचा- “गुवाहाटीचे गुलाबराव पाटील खरे, की आताचे?” परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने हसन मुश्रीफांचा टोला, म्हणाले…

पटोले यांनी पुढे सांगितलं की, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने आज मंत्रालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने काल आत्महत्या करून आयुष्य संपवले. अन्य एका शेतकऱ्याला मंत्रालयलाच्या सहाव्या मजल्यावर मारहाण करण्यात आली, शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे. पण राज्यातील सरकार आपल्याच मस्तीत वागत आहे. शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही, ही भावना वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये कोरडवाहूसाठी तर बागायती व फळबागासाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत केली पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

हेही वाचा- औरंगाबाद : कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत शिवसेनेकडून मोठा घोटाळा, माजी महापौरांचे गंभीर आरोप

रायगडच्या समुद्रात घातकं शस्त्रे असलेली एक बेवारस बोट सापडली आहे. तर मुंबईतील एका वाहतूक पोलिसाच्या व्हॉट्सअॅपवर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश आला, ही गंभीर बाब आहे. मुंबई शहर हे संवेदनशील शहर आहे, पण हे प्रकार समोर आल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्य सरकारने या प्रमुख विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे, असंही पटोले म्हणाले.