मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत ३० हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील काही उर्वरित आमदार देखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कसलाही धोका नसल्याचं विधान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाबाबत काय करायचं? हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. या सर्व षडयंत्रापाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सध्याच्या घडीला तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहात का? असं विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, “बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत. काल सायंकाळी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगितलं. तसेच तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत, असं आश्वासनही दिलं. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी सोनिया गांधी यांनी जो आशीर्वाद दिला होता. तो आजही आमच्यासोबत कायम आहे. काँग्रेसचे सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत,” असंही ते म्हणाले.
‘महाविकास आघाडी नको, वेगळा पर्याय हवा’ एकनाथ शिंदेच्या या प्रस्तावाबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “आमची कोणालाही जबरदस्ती नाही, आधीही आमची कोणाला जबरदस्ती नव्हती आणि आजही नाही. विरोधी पक्ष म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं. त्यामुळे आम्ही सत्तेत जाण्यासाठी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते आमच्याकडे आले होते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही यांच्यामध्ये सामील झालो,” असं नाना पटोले म्हणाले.