एकनाथ शिंदे बंडखोरीप्रकरणावरून मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील काही आमदार गुवाहाटीला जावून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ आणखी वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सुरतमधून सुटून आलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी देखील भाजपावर खळबळजनक आरोप केले आहे. या सर्व प्रकरणामध्ये भाजपाचाच हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरून एक मीम शेअर करत भारतीय जनता पार्टीला खोचक टोला लगावला आहे. “दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणे ही भाजपाची जुनी खोड आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी शेअर केलेल्या मीममध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकृत्या वापरण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारताना दिसत आहेत. नाना पटोले यांची ही फेसबूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

दुसरीकडे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली मागणी मांडावी, त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल, त्यांनी २४ तासांत मुंबईत या, असं आवाहन देखील संजय राऊतांनी केलं आहे.