नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली, अशा आशयाचा खुलासा अजित पवारांनी केला.
अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांना मदत केली असती, तर त्या निवडून आल्या असत्या, असं विधान नाना पटोले यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान!
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, “या निमित्ताने अजित पवारांनी चांगला खुलासा केला आहे, की राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यजित तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केली, अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार ही एक जबाबदार व्यक्ती आहे. ते अशा पद्धतीने बोलत असतील तर या सगळ्या गोष्टीची चिंता आमच्याही मनात आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर याबाबत आम्ही खुलासा करू.”
हेही वाचा- “परबांनी उलटा सूर्यनमस्कार घालू नये, त्यांना…”, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत आशिष शेलारांची टोलेबाजी!
“मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला नाही, पण अजित पवारांचं तसं विधान आहे. राष्ट्रवादीने सत्यजित तांबेंना निवडून आणण्यासाठी मदत केली, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी पूर्ण ताकद लावली असती, तर शुभांगी पाटील निवडून आल्या असत्या,असा त्याचा अर्थ होतो. खरं तर, अजित पवारांनी नेमक्या कोणत्या अर्थाने हे वक्तव्य केलं आहे, त्यावर आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करू…” असंही नाना पटोले पुढे म्हणाले.