एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला एमआयएमसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. जलील यांच्या या प्रस्तावानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला कट्टरतावाद मान्य नाही, असं म्हटलंय. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमआयएमकडून अद्यापतरी प्रस्ताव आलेला नाही, असं म्हणत जलील यांची भूमिका सेक्यूलर असेल तर प्रस्तावावर विचार करू असं म्हटलंय. टीव्ही ९ मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले ?
“इम्तियाज जलील यांचा नेमका प्रस्ताव काय आहे ? त्यांचं मत काय आहे, हे एकदा समजून घेऊ आणि त्यांचं जे मत असेल ते आमच्या काँग्रेस विचारसरणीशी जुळत असेल सेक्यूलर असेल तर बिलकूल त्यांच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल. पण तसा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही,” असं नाना पटोले यांनी म्हटलंय.
थोरात म्हणाले कोणताही कट्टरवाद मान्य नाही
तर दुसरीकडे जलील यांच्या याच प्रस्तावावर आम्हाला कोणताही कट्टरवाद मान्य नाही, असं भाष्य केलंय. “आम्हाला कोणताच कट्टरवाद मान्य नाही. कोणत्याच समाजाचा, धर्मचा कट्टरवाद आम्हाला मान्य नाही. आम्हाला सर्वधर्मसमभाव हवा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे तत्त्वज्ञान आम्हाला मान्य आहे. त्याच तत्त्वज्ञाने आम्ही पुढे जात आहोत. कोणताच कट्टरवाद आम्हाला मान्य नाही,” असे थोरात म्हणाले आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांनी काँग्रेसच्या विचारसरणीशी जुळणारा एमआयएमचा प्रस्ताव असेल तर विचार करु असे वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने एमआयएमची ही ऑफर स्पष्टपणे धुडकावून लावली असून एमआयएमसोबत जाणे शक्य नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य नेत्यांनी ठणकावून सांगितलं आहे.